नवी दिल्ली – आगामी काळात 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडीसाठी करण्यात होत असलेल्या प्रयत्नाला आज मोठे यश मिळाले आहे. काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षांनी एकत्र येण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.
तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भाजपाविरोधात व्यापक आघाडी उभी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, नायडू यांनी आज राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाच्या युतीची घोषणा केली.