राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधींना अशी दिली श्रद्धांजली

0

नवी दिल्ली-‘माझ्या वडिलांनी मला सर्वांवर प्रेम करणे आणि सर्वांचा सन्मान करणे शिकविले. ही त्यांनी दिलेली सर्वांत बहुमूल्य भेट आहे, असे भावूक ट्विट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल यांनी केले. राहुल गांधी यांनी आपले वडील आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आमच्यापैकी जे राजीव गांधींवर प्रेम करतात. ते नेहमी त्यांना आपल्या हृदयात ठेवतील, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी झाला होता. ते भारतातील सर्वांत कमी वयाचे पंतप्रधान ठरले होते. केंब्रिजमधील ट्रिनिटी महाविद्यालय आणि लंडनमधील इंपरियल महाविद्यालयातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. वर्ष १९८४ मध्ये आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर प्रचंड बहुमतात वयाच्या ४० व्या वर्षी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.

२१ मे १९९१ मध्ये चेन्नईजवळील श्रीपेरूबंदूर येथील प्रचारसभेदरम्यान आत्मघातकी हल्ल्यात राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, राहुल आणि प्रियंका गांधी यांनी वीरभूमी येथे जाऊन राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. यावेळी सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, रॉबर्ट वद्रा आदींनीही राजीव गांधींच्या स्मृतीस अभिवादन केले.