‘वॉटरग्रेस’च्या कर्मचाऱ्यांचा असाही प्रताप; चक्क कचऱ्यात भरली माती
मक्तेदाराला पाच हजार रुपयांच्या दंडासह कारणे दाखवा नोटीसही बजावली
जळगाव प्रतिनिधी । कचरा भरताना त्यात वजन साफसफाईचासाठी चक्क माती भरली जात असल्याचा प्रकार बुधवारी शहरातील निवृत्तीन
गरात उघडकीस आला आहे. वॉटरग्रेस कंपनीकडून जळगावकरांच्या पैशांची लूट होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकारानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या कानावर हा प्रकार घातला. भविष्यात असा प्रकार झाला तर मक्तेदाराला काळे फासण्याचा इशारा नीलेश पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित मक्तेदाराला पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. वॉटरग्रेस कंपनीने शहरातील साफसफाईचा मक्ता घेतलेला
आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी ओला व सुका कचरा संकलित केला जातो. त्याशिवाय कॉलनी व गल्ल्यांमध्ये उघड्यावर असलेला कचरा संकलित करून तो शहराबाहेर टाकला जातो. कचऱ्याच्या एकूण वजनावर कंपनीला मोबदला अदा केला जातो. वॉटरग्रेस कंपनी व महापालिका यांच्यात कचऱ्याचा करार झालेला आहे. एका टनासाठी ९७० रुपये असा मोबदला देण्यात येतो. शहरातून एका दिवसाला ३१० टनापेक्षा जास्त कचरा संकलित होत असल्याचे दाखविले जाते. कचऱ्यात माती भरून वजन वाढविले जात असेल तर खरोखर कचरा किती असू शकतो, याचा अंदाज येतो. कचऱ्याच्या नावाने माती भरण्याचे उद्योग करून एक प्रकारे जनतेच्या पैशांची लूट होत आहे. शिवसेनेचे ( शिंदे गट) जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेने करारनाम्यातील अटी शर्तीचे उल्लंघन केले म्हणून कंत्राटदारला जागेवरच पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. याशिवाय गुरुवारी कारणे दाखवा नोटीसही बजावली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.