मुळशी : उन्हाळी शिबिरासाठी पुण्यात आलेल्या चेन्नईतील इसीएस मॅट्रिक्युलेशन शाळेच्या तीन विद्यार्थ्यांचा मुळशीनजीकच्या कातरखडक धरणात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. डॅनिश राजा, संतोष के. आणि सर्वन्ना अशी या तिघांची नावे असून, हे तिघेही 13 वर्षांचे होते. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास या तिघांनी पोहण्यासाठी धरणात उड्या घेतल्या होत्या. मात्र, त्यांना धरणातून बाहेर पडता आले नाही. कालपासून त्यांचा शोध घेतला जात होता. गुरुवारी तिघांचेही मृतदेह बचाव पथकांच्या हाती लागले. एनडीआरएफ, अग्निशमन जवान आणि स्थानिक पोलिसांनी या मुलांच्या शोधासाठी जोरदार मोहीम राबविली होती. या घटनेने एकच शोककळा पसरली होती. दुपारनंतर हे मृतदेह चेन्नईकडे रवाना करण्यात आले होते.
हे देखील वाचा
धरणात उड्या मारल्या अन् बेपत्ता झाले!
चेन्नईमधील इसीएस मॅट्रिक्युलेशन शाळेतील 20 विद्यार्थ्यांचा गट मुळशीतील जॅकलीन स्कूलमध्ये एक आठवड्याच्या उन्हाळी शिबिरासाठी आला होता. या गटासोबत एक पुरुष आणि तीन शिक्षिका होत्या. बुधवारी त्यांच्या शिबिराचा पहिलाच दिवस होता. शिबिर संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक कातरखडक धरणाजवळ आले. त्यातील तीन विद्यार्थ्यांनी पोहोण्याचा आनंद लुटण्यासाठी धरणात उड्या मारल्या. बराचवेळ झाला तरी ते धरणातून बाहेर आले नाही. त्यामुळे इतर विद्यार्थी व शिक्षकांनी आरडाओरड सुरु केली. त्यानंतर एनडीआरएफ, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन या तिघांचा शोध सुरु केला. रात्री उशिरापर्यंत एकाच विद्यार्थ्याचा मृतदेह हाती लागला होता.
रात्र झाल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. गुरुवारी सकाळी शोधकार्य पुन्हा सुरु केले असता, इतर दोघांचेही मृतदेह हाती लागले. डॅनिश राजा, संतोष के. आणि सर्वन्ना अशी या मुलांची नावे असून, तिघेही तेरा वर्षांचे आहेत. घटनास्थळी मुळशीचे तहसीलदार यांच्यासह गावातील सरपंच, पोलिस पाटील यांनी धाव घेतली होती. मृत मुलांच्या कुटुंबीयांना रात्रीच कळविण्यात आले होते. मुलांच्या शवपरीक्षणानंतर हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. परराज्यातून आलेल्या मुलांचा अशाप्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत होती. पोलिस पुढील तपास करत होते.