जमिनीसाठी मुलाने केली बापाची हत्या

0

पुणे – ओम शक्ती बाबा मठातील सेवेकऱ्याच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. जमिनीच्या हव्यासापोटी मुलानेच स्वतःच्या बापाचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. याप्रकरणी सुखराज दगडू टेमगिरे (वय ४० वर्षे रा. भरतगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक केलेल्या खुनी मुलाचे नाव आहे.

निर्जन ठिकाण असल्याने शोध कार्यास अडथळा 

७ मे’ला सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी भुलेश्वर मंदिराच्या लगत डोंगराच्या कुशीत असलेले ओम शक्ती बाबा मठात राहत असलेले सेवेकरी दगडू लक्ष्मण टेमगिरे (वय ७० रा. भरतगाव ता. दौंड जि. पुणे) यांचा अज्ञात व्यक्तीने खून केला होता. हा मठ दौंड आणि पुरंदर तालुक्याच्या सीमेवर आहे. डोंगराच्या कडेला हे अतिशय निर्जन ठिकाण आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लोकांची ये-जा कमी असते. त्यामुळे गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध होण्यास पोलिसांसमोर फार मोठे आव्हान होते.

आरोपीने मठाच्या खोलीत खून केल्यानंतर खोलीच्या दरवाजास बाहेरून कुलूप लावून किल्ली नेहमीच्या ठिकाणी देवळातील मूर्तीच्या मागे ठेवली होती. त्यामुळे हा खून हा तेथे नेहमी येणाऱ्या आणि ओळखीच्या व्यक्तीनेच केला असल्याची पोलिसांची खात्री झाली होती. त्या दृष्टीने मठाचे ट्रस्टचे सदस्य तेथे नियमित येणारे भाविक यांच्याकडे जावून चौकशी केली. परंतू योग्य माहिती मिळत नसल्याने पथकाने मयताच्या गावी भातगाव येथे जाऊन वेशांतर करून गावातील लोकांकडून माहिती मिळवण्यास सुरुवात केली. दगडू यांचा लहान मुलगा सुखराज यास दारूचे व्यसन असून त्याने वडिलांचे नावे असलेली जमीन ही त्यांच्याच गावातील एका व्यक्तीला विकण्याचे कबूल करून त्याच्याकडून विसार रक्कम घेतली होती. कोणतेही धागेदोरे नसताना गुन्हे शाखेच्या पथकाने वेषांतर करून तपास करीत आरोपी सुखराज टेमगिरे यास जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.