वॉशिंग्टन-अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने सुर्याच्या जवळून अभ्यासासाठीच्या मोहिमेला यशस्वीरित्या सुरुवात केली आहे. त्यासाठी ‘पार्कर सोलर प्रोब’नामक अंतराळयानाचे अवकाशात आज रविवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या यानाद्वारे सोडण्यात आलेल्या उपग्रहाच्या माध्यमांतून सुर्याचा अधिक जवळून अभ्यास करण्यात येणार आहे.
अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील केप केरनेवल या हवाई दलाच्या प्रक्षेपण केंद्रावरुन याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाटे ३ वाजून ३१ मिनिटांनी याचे प्रक्षेपण करण्यात आले. शनिवारीच या अंतराळयानाचे प्रक्षेपण केले जाणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ते थांबवण्यात आले होते त्यानंतर आज त्याचे यशस्वी प्रक्षेपण झाले. सुरुवातीला हे यान शुक्राच्या कक्षेभोवती फिरणार आहे. त्यानंतर शुक्राच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत आपला निश्चित वेग गाठत ते पुढे सुर्याच्या दिशेने रवाना होईल.
डेल्टा ४ या जगातील दुसऱ्या सर्वाधिक शक्तीशाली रॉकेटच्या माध्यमातून हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. एका कारच्या आकाराचे हे अंतराळयान सुर्याच्या पृष्ठभागापासून ६.१६ दशलक्ष किमी अंतरावरुन जाणार आहे. यापूर्वी सोडण्यात आलेल्या अंतराळयानांपैकी आजवर कोणत्याही यानाने सुर्याच्या इतक्या जवळ जाऊन सुर्याच्या तापमानाचा आणि उष्णतेचा सामना केलेला नाही. सुर्याच्या चहुबाजूने कशा प्रकारे उर्जा आणि प्रकाश निर्माण होतो, तसेच सुर्यापासून निघणाऱ्या सौर लहरींचा अभ्यास या मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे. पुढील ७ वर्षे हे यान सुर्याचे वातावरण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पावर नासाने तब्बल १०३ अब्ज रुपये खर्च केले आहेत.
या अंतराळयानाला सक्षम अशा हिट शील्डने सुरक्षित करण्यात आले आहे. कारण सुर्याजवळ जाताना त्याचे तापमान आणि पृथ्वीपेक्षा ५०० पट जास्त रेडिएशन तो रोखू शकेल. अमेरिकेचे खगोलशास्त्रज्ञ युजीन नेवमॅन पार्कर यांच्या नावावरुन या यानाचे नाव ठेवण्यात आले आहे. हे यान जेव्हा सुर्याच्या सर्वाधिक जवळून जाईल तेव्हा तिथले तापमान २५०० डिग्री सेल्सिअस इतके असेल. हे यान सुमारे ४ लाख ३० हजार माइल प्रति तास वेगाने प्रवास करेल. कोणत्याही मानवनिर्मित वस्तूच्या गतीपेक्षा ही गती सर्वाधिक आहे.