राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी तटकरेंची माघार

0

मुंबई- गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या आमदार सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांची गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी निवड झाली आहे. सलग ४ वर्ष प्रदेशाध्यक्ष पद सांभाळले असल्यामुळे माझा विचार न करता इतर सक्षम नेत्याचा विचार करावा अशी मागणी पक्षाकडे केली असल्याचे तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

आगामी २९ तारखेला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या पदासाठी सुनील तटकरे यांच्यासह जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, आता तटकरे यांनी स्वतः माघार घेतल्याने या पदासाठी जयंत पाटील यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.

तटकरे म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संघटनात्मक निर्णय झाले असून नुकताच राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी शरद पवारसाहेबांचा अर्ज आम्ही दाखल केला आहे आणि आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी २९ एप्रिलला निवडणूक होत आहे. ४ वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. सलग ४ वर्ष प्रदेशाध्यक्ष पद सांभाळले असल्यामुळे माझा विचार न करता इतर सक्षम नेत्याचा विचार करावा अशी मागणी पक्षाकडे केली असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

विधानपरिषदेसाठी लवकरच निर्णय
दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विधानपरिषदेच्या जागांसाठी येत्या दोन दिवसात दोन्ही पक्षात चर्चा होईल आणि निर्णय घेतला जाईल असे सांगतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि त्यांच्या नेत्यांसोबत मी, अजित पवार, धनंजय मुंडे यांनी जागांबाबत चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसात राष्ट्रीय पातळीवर चर्चा होवून निर्णय घेतला जाईल अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली.