मुंबई –नाणार रिफायनरीवरील लक्ष विचलित करण्यासाठीच सरकारकडून मुंबईचा विकास आराखडा जाहीर करण्यात आला. तशी माहिती ट्वीटरवर पाहिली असल्याचा आरोप करतानाच आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या आराखडयाची माहिती प्रधान सचिव आणि आयुक्त जाहीर करतात हे मी कधी माझ्या कारकिर्दीमध्ये पाहिले नव्हते असा जोरदार हल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
कोकणात होवू घातलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन सेना-भाजप यांच्यात सुरु असलेल्या वादावर सुनिल तटकरे यांनी जोरदार टिका केली. राज्याच्या उदयोगमंत्र्यांनी नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली त्याला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उत्तर देतानाच उदयोगमंत्र्यांना अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार नाही असं सांगत त्यांचे ते व्यक्तीगत मत होते असे स्पष्ट केले. मी माझ्या १५ वर्षाच्या कालखंडामध्ये मला कळले नाही की, धोरणात्मक निर्णयावर व्यक्तिगत मत असू शकते. असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला. नाणार प्रकल्पाची प्रक्रिया सुरु झाली का ? तर त्याची अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचेही सुनिल तटकरे म्हणाले.
सरकारची दुष्काळाची परिभाषा, परिमाण काय
सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. विदर्भ, मराठवाडा यामध्ये पावसाचे प्रमाण कमीच असते. सरकारी आकडेवारीनुसार विदर्भ आणि मराठवाडयात दुष्काळ हा कायमच आहे. मात्र या सरकारची दुष्काळाची परिभाषा, परिमाण काय आहे याचे आकलनच होत नाही. त्यांची भूमिका स्पष्टच होत नाही असेही तटकरे म्हणाले.