बंडखोर आमदारांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

0

नवी दिल्ली: कर्नाटकमधील सत्ता संघर्षाचे नाटक संपायचे नाव घेत नसून, आज सुप्रीम कोर्टात बंडखोर आमदारांवर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे कॉंग्रेस आणि जेडीएस यांचे डोळे लागले आहे. जेडीएस आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी गेल्या आठवड्यात झाली. यावेळी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर मंगळवारपर्यंत निर्णय घेऊ नका, असा आदेश सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.

सरकार वाचवण्यासाठी जेडीएस आणि कॉंग्रेस पक्ष शर्तीचे प्रयत्न करता असल्याचे पहायला मिळत आहे. बंडखोर आमदारांची समजूत काढण्याच्या पडद्यामागून हालचाली सुरु आहेत. यामध्ये २ आमदारांची समजूत काढायला कॉंग्रेसला यश मिळाले आहे. पण काही आमदार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे. दरम्यान मुंबईमध्ये असलेल्या आमदारांनी काँग्रेस नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे मुंबई पोलिसांना पत्र लिहून सांगितले आहे.

तसेच बंडखोर आमदारांनी आपल्या पत्रात कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद यांच्यासह अन्य कोणत्याही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नेत्यांशी आम्ही चर्चा करणार नाही. आम्हाला त्यांच्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असे या बंडखोर आमदारांनी म्हटले आहे. सत्ताधारी जद (एस) व काँग्रेस आघाडीतील 16 आमदारांनी राजीनामा दिल्याने डळमळीत झालेल्या कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी सरकारच्या भवितव्याचा फैसला येत्या गुरुवारी होणार आहे. एकूणच दिवसेंदिवस हा सत्तासंघर्ष अधिक रंगतदार होणार यात दुमत नसल्याचे जाणकारांनी सांगितले.