पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचे मोफत तिकीट दिले नाही म्हणून पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी नाटक रोखण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, छत्रपती संभाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत अतिशय प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा प्रयत्न खासदार डॉ अमोल कोल्हे करीत आहेत. त्यांच्या या प्रयोगांना राज्यातील शिवप्रेमी जनता उदंड प्रतिसाद देत असताना पिंपरी चिंचवड येथील प्रयोगाच्या दरम्यान या महानाट्याच्या फुकट प्रवेशिकेसाठी येथील पोलिसांनी धमक्या दिल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र पोलीसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळीमा फासणारी ही घटना आहे. खासदार असणाऱ्या डॉ कोल्हे यांना अशा पद्धतीने धमकी दिली जाते ही अतिशय गंभीर बाब आहे. खासदारांना पोलीस अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.
राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची तातडीने याची दखल घेऊन पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली आहे.