मोठ्या फरकाने निवडून येणार-सुरेश धस

0

बीड : उस्मानाबाद-बीड-लातूर या जागेसाठी होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत शंभर ते दीडशे मतांच्या फरकाने निवडून येईल असा दावा भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी केला आहे. बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यांमध्ये भाजपला चांगले मतदान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने आचारसंहितेचे उल्लंघन केले 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने गुप्त मतदान पद्धतीचे उल्लंघन केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांच्या हातात घड्याळ घातले, काहींना किचन दिले, तर काहींच्या शर्टवर चिप्स लावले, असा आरोप त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला आहे.

लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली.

त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला. या तीन जिह्ल्यात मिळून एकूण 1006 मतदार आहेत. यापैकी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून 527, 94 अपक्ष, शिवसेनेचे 64 आणि भाजपचे 321 मतदार आहेत. त्यामुळे भाजप मतांचे गणित कसे जुळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.