घरकूल घोटाळा : सुरेशदादांना तीन महिन्यांचा जामीन मंजूर

0

जळगाव – घरकूल घोटाळाप्रकरणी कारागृहात असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना वैद्यकीय उपचारासाठी ५ लाखाच्या जातमुचलक्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने तीन महिन्यांचा अतंरिम जामीन मंजूर केला.

राज्यभर गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना ऑगस्ट महिन्यात धुळे जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी सात वर्षांची शिक्षा आणि १०० कोटींचा दंड ठोठावला आहे. या खटल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ आरोपींना दोषी ठरवले होते. यातील बहुतांश आरोपींचा नाशिक कारागृहात मुक्काम आहे. काही संशयितांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतल्यानंतर काही जणांचा जामीन मंजूर आधीच झाला आहे. मात्र मुख्य संशयित असलेले सुरेश जैन यांना अद्याप दिलासा मिळाला नव्हता. दरम्यान गेल्या दोन आठवड्यापुर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत असल्याने त्यांच्यावर मोठ्या रुग्णालयात उपचारांची गरज असल्याचे बोलले जात होते. यापार्श्‍वभूमीवर त्यांना तीन महिन्यांचा अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे.