भुसावळ l भुसावळ येथील वादग्रस्त प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांच्यावर अखेर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. पुढील आदेशापर्यंत त्यांच्याविरोधात ही कारवाई असणार आहे. राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाचे अवर सचिवांनी हे आदेश काढले आहेत.
राज्य शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, बोदवड तालुक्यातील जलचक्र खुर्द येथील एका क्षेत्राचा शेती प्रयोजनासाठी वापर न करता, मे. महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाने 2017 ते डिसेंबर 2019 दरम्यान जमिनीतून लाखो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करून जमिनाचा वापर व्यावसायिक कामासाठी केला. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने चौकशी करून केवळ 4294. 21 ब्रासचे उत्खनन झाल्याचे दाखवून दंड आकारून क्रशर मालकाला पाठीशी घालण्याचे काम केल्याची तक्रार विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सुचनेव्दारे मांडण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेनंतर महसुल मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकार्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार चौकशीअंती येथील प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना दोषी ठरवून शिस्तभंगाच्या कारवाईंतर्गत शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेशा पर्यंत ही कारवाई कायम असणार आहे. निलंबनाच्या कालावधीत सुलाने या़ंचे मुख्यालय हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय असेल या काळात त्यांना जिल्हाधिकार्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबन काळात सुलाने यांना निलंबन भत्ते मिळेल, पण या काळात त्यांना कोणताही व्यवसाय किंवा खाजगी नोकरी करता येणार नाही, असेही या आदेशात म्हटले आहे.