कर्नाटकात शपथविधीची लगबग, मंत्रिमंडळात ‘या’ आमदरांच्या नावांची चर्चा; काँग्रेस जातीय आणि प्रादेशिक संतुलन राखणार?
Karnataka CM Latest News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळालं. २२४ पैकी १३५ जागा मिळाल्याने काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. सिद्धरामय्या आणि डी. के शिवकुमार यांची अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर आज हे दोघेही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तसंच, त्यांच्यासोबत इतर २८ मंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. काही मंत्र्यांसह सिद्धरामय्या आणि डि. के. शिवकुमार शपथ ग्रहण करतील, असं काँग्रेसचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी याआधीच सांगितलं होतं. परंतु, कोणाला कोणत्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येणार, याबाबत अधिकृत खुलासा आलेला नाही.
शपथविधीपूर्वी काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळाची स्थापना आणि खातेवाटप या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. तसेच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली. गुरुवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाने औपचारिकरीत्या सिद्धरामय्या यांची नेता म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिले. बंगळूरुमधील कांतीरवा मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे. शनिवारी सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून, तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. या वेळी काही मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रीपदाच्या काही प्रमुख नावांमध्ये कर्नाटक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वरा, लिंगायत नेते एम बी पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य आणि माजी मंत्री केजे जॉर्ज यांचा समावेश आहे. तर, काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे, माजी केंद्रीय मंत्री के एच मुनियप्पा यांच्या कन्या रूपा शशिधर, कर्नाटक काँग्रेसच्या कार्याध्यक्षा ईश्वरा खांद्रे, माजी मंत्री तन्वीर सैत, ज्येष्ठ नेते कृष्णा बायरे गौडा आणि कर्नाटक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते बी. हरिप्रसाद हेसुद्धा आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे या वृत्तात म्हटलं आहे.
या शपथविधी सोहळ्याकडे विरोधकांच्या ऐक्याचे प्रदर्शन आणि शक्तिप्रदर्शन म्हणूनही पाहिले जात आहे. त्यासाठी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच समविचारी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, भाकपचे डी. राजा आणि माकपचे सीताराम येचुरी, कमल हासन यांचा समावेश आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या शपथविधी सोहळ्यास जाणार नाहीत. त्याऐवजी त्या पक्षाच्या नेत्या काकोली घोष दस्तीदार यांना आपल्या प्रतिनिधी पाठवणार आहेत, अशी माहिती तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी ट्वीट करून दिली.