पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण करणा-यांवर कडक कारवाई करा

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी

*मुंबई दि. १०* पाचोरा जिल्हा जळगाव येथील पत्रकार श्री.संदीप दामोदर महाजन यांना स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ करीत मारण्याची धमकी देत त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाजन यांना आज भर चौकात जबर मारहाण केली. या घटनेचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने तीव्र शब्दात निषेध करीत धमकी देणारे आमदार आणि मारहाण करणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाचोरा येथील पत्रकार संदीप दामोदर महाजन यांनी केलेल्या वृत्त विश्लेषणानंतर त्यांना धमकी देवून स्थानिक लोकप्रतिनिधीच्या गुंडांनी पत्रकार महाजन यांच्यावर आज गुरूवारी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. पत्रकार महाजन यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक असून, त्यांच्या वडीलांना आणि आईसही गुंडांनी शिवीगाळही केली. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या हस्तकांनी केलेल्या या हल्ल्याचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, हल्ल्याला फूस देणारे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या हस्तकांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई करावी अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने महामहिम राज्यपाल श्री. रमेश बैस यांना निवेदनाद्वारे केली आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिका-यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री.भूषण गगराणी आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री कार्यालयाचे सचिव श्री. डॅा. श्रीकर परदेशी यांची भेट घेवून निवेदनाद्वारे हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली.

 

प्रमोद डोईफोडे प्रविण पुरो

अध्यक्ष कार्यवाह