चोपडा- तालुक्यातील तांदलवाडी येथे चुडामण भटा कंखरे (५०) या शेतकर्याचा शेतात काम करीत असतांना मृत्यू झाला. उष्माघातामुळे हा मृत्यु झाल्याची परीसरात चर्चा होती.
याबाबत वृत्त असे की, तांदलवाडी ता. चोपडा येथे शेतात कापूस लागवड करण्यासाठी सरी पाडण्यास गेलेले शेतकरी चुडामण भटा कंखरे (५०) हे सकाळपासून शेतात काम करीत होते. दु. १२ वाजता त्यांच्या पत्नीने शेतात डबा आणला. जेवण झाल्यावर त्या घरी गेल्या. इकडे शेतकरी पुन्हा कामाला लागले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेजारील प्रदीप वसंतराव पाटील यांच्या शेतात निंबाच्या झाडाखाली ते बेशुद्ध अवस्थेत पडलेले एका बकरी चारणार्यास दिसले. त्याने ही माहिती गावात पोहचवली असता त्यांना उपजिल्हा रुग्णालयात ४.३० वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ. गुरुप्रसाद वाघ यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉ. गुरुप्रसाद वाघ यांच्या खबरीने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भरत नाईक हे करीत आहेत. तापमानाचा पारा ४४ डिग्री सेल्सिअस असल्याने उन्हात तापलेल्या जमिनीत काम केल्याने हा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
व्हिसेरा तपासणीसाठी रवाना
शेतकरी चुडामण कंखरे यांच्या मृत्यूचे कारण नेमके कळू शकले नाही. शवविच्छेदन करणारे डॉ. गुरुप्रसाद वाघ यांनी सांगितले की, मयत शेतकर्याचा व्हिसेरा काढून तपासणी साठी रवानगी करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच नेमके मृत्यूचे कारण समजेल.