तरडी गावात हिट अ‍ॅण्ड रनचा थरार चार गंभीर ; एकाचा मृत्यू

0

भरधाव ट्रकने रस्त्यावरील लोकांना चिरडले

शिरपूर – तालुक्यातील तरडी गावात बस स्थानक परिसरात बसलेले तरडी गावातील चार लोकांना चोपड्याकडे जाणार्‍या एका भरधाव ट्रॅकने चिरडल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. शनिवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनी हा हिट अ‍ॅण्ड रनचा थरार अनुभवला. या अपघातात चारही जण गंभीर जखमी झाले होते. यात उपचारादरम्यान धुळे येथे एकाचा मृत्यू झाला आहे.

शिरपूर चोपडा रस्त्यावरील तरडीजवळ सकाळी 9:30-च्या दरम्यान चोपड्याकडे भरधाव ट्रकवरील (जीजे-06-एव्ही-8625) चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. यानंतर ट्रकने बसस्थानकावरील अ‍ॅपेरिक्षा आणि तीन दुचाकीना जोरदार धडक देत टपरीवर बसलेले गोरख मणिराम पाटील (67), धनराज संतोष पाटील (53), निवृत्ती एकनाथ पाटील (52) आणि सुकदेव गिरधर पाटील (80) रा़ तरडी ता़ शिरपूर यांना चिरडले. व ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला. अपघातातील जखमींना तातडीने गावकर्‍यांनी शिरपूर येथे रुग्णालयात दाखल केले.

वाहतुकीची कोंडी
शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर अति गंभीर धनराज पाटील, गोरख पाटील , निवृत्ती पाटील यांना पुढील उपचारासाठी धुळ्यात हलविण्यात आले होते. धुळे येथे उपचारादरम्यान निवृत्ती एकनाथ पाटील यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती़ घटनास्थळी शिरपूर व थाळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले होते. पुढील कार्यवाही थाळनेर पोलीस करीत आहेत