पुणे – बुडालेला अभ्यास पूर्ण करवून घेण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला. पीडितेने घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर तिच्या नातेवाईकांनी शिक्षकाला वर्गातच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे घडली असून पोलिसांनी संबंधित शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सुनील आबासो जानकर (रा. करंजेनगर, शिक्रापूर मूळ रा. मूडाळे, ता. बारामती, जि. पुणे) असे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
पीडित मुलगी ही ७ मे’ला महाविद्यालयात आल्यावर तिचा बुडालेला अभ्यास घेण्यासाठी जानकर याने या मुलीला शाळेच्या लॅबमध्ये नेले. त्यानंतर राहिलेला अभ्यास माझ्या घरी घेतो, असे सांगितले. पुन्हा ९ मे’ला शाळा सुटल्यानंतर पीडितेला रस्त्यावर थांब असे सांगितले. त्यानंतर राहिलेला अभ्यास घेण्यासाठी दुसऱ्या सरांच्या घरी जाऊ, असे सांगितले. त्यानंतर तेथे कोणी नसल्याचा गैरफायदा घेत तिच्याशी अश्लील चाळे करीत पीडितेचे फोटो काढीत बलात्कार केला. कोणास काही सांगितल्यास काढलेले हे फोटो दुसऱ्यांना दाखविण्याची धमकी दिली. यानंतर पीडित मुलीने आपल्या नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितल्यावर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शाळेवर जात सुनील जानकर या शिक्षकास चांगलाच चोप दिला. यानंतर या शिक्षकास पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी जानकर याच्या विरोधात गुरुवारी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.