कसोटी सामन्यासाठी आज संघाची निवड

0

हैदराबाद – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अफगानिस्तान सोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यासाठी आज भारतीय संघाची निवड करणार आहे. यामध्ये मंडळाची वरिष्ठ निवड समिती आयर्लंडसोबत होणारी टी-२० ची मालिका, इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठीही खेळाडुंची निवड होणार आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध १ कसोटी, ज्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली खेळणार नाही. त्याने इंग्लंड दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची त्याच्याऐवजी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विराटच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात येईल. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज अ विरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी भारत अ संघाची निवड करण्यात येईल. तर इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी नंतर भारतीय संघ निवडण्यात येणार आहे.

आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात रोहित शर्माकडे भारतीय संघाचे कर्णधारपद असेल. दरम्यान मंडळाची ही बैठक सायंकाळी ५ वाजता मुंबईतील ताज वेस्ट एंड हॉटेलमध्ये होणार आहे.