नॉटिंगहम- टी -२० मालिकेत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर विराट कोहलीची ‘टीम इंडिया’ आज १२ जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेचा शुभारंभ करणार आहे. आगामी वर्षी इंग्लंडमध्येच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने भारतासाठी ही मालिका म्हणजे रंगीत तालीमच होय. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघही जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने ही द्विपक्षीय मालिका म्हणजे क्रिकेटशौकिनांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.
प्रयोगांची संधी
भारताच्या संघव्यवस्थापनाला या एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने आगामी वर्षीत होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विविध प्रयोग करण्याचीही संधी असेल. त्याचाच एक भाग म्हणून लोकेश राहुलचा जबरदस्त फॉर्म पाहता कर्णधार विराट कोहली खालच्या क्रमांकावर फलंदाजीस उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बटलरचे सातत्य आणि जॉसनचा पॉवर प्ले
यंदाची आयपीएल स्पर्धा गाजवणारा जोस बटलर आणि पॉवर प्लेचा सदुपयोग कसा करावा याचे प्रात्यक्षिक देणारा जेसन रॉय हे भारताची डोकेदुखी ठरू शकतात. मधल्या फळीत जो रूट आणि इयॉन मॉर्गन यांच्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजीला बळकटी मिळाली आहे.
हे देखील वाचा
या खेळाडूंवर मदार
शिखर धवन आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करतील, तर लोकेश राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येईल. फलंदाजीचा हा क्रम राहिल्यास कोहली चौथ्या स्थानाकर फलंदाजीला येऊ शकतो. त्यानंतर सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी आणि अष्टपैलू हार्दिक पंडय़ा असा फलंदाजीचा क्रम असेल. गोलंदाजीत टी-२०मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर सिद्धार्थ कौल किंवा शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एकाला अतिरिक्त गोलंदाज म्हणून अंतिम संघात स्थान मिळू शकते. कमरेच्या दुखापतीतून सावरलेला भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या वेगवान जोडगोळीवर नव्या चेंडूची जबाबदारी असेल.
यजमानांनी कात टाकलीय
ऑस्ट्रेलियाला वन डे मालिकेत ५-० ने धूळ चारणाऱ्या इंग्लंडचा आत्मविश्वास कमी असण्याचे कुठलेही कारण नाही. गेल्या काही दिवसांत इंग्लंडच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. जोस बटलर, जेसन रॉय, ऍलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्टो आणि इयॉन मॉर्गन चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. शिवाय अष्टपैलू बेन स्टोक्सच्या पुनरागमनाने संघाची ताकद आणखी वाढली आहे. २०१५ नंतर इंग्लंडच्या संघाने जणू कातच टाकली आहे. कारण त्यानंतर झालेल्या ६९ पैकी ४६ सामन्यांत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली आहे. या ६९ सामन्यांपैकी ३१ सामन्यांमध्ये इंग्लंडने ३००हून अधिक धावांचा पल्ला लीलया गाठला असून २३ सामन्यांत विजय मिळवला आहे.