तेजस्विनी बससेवेला दर रविवारी सुट्टी

0

पुणे :- महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी बससेवेला दर रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. तेजस्विनीला महिला प्रवाशांची प्रतिसाद कमी मिळत असल्याने मे महिन्याच्या पहिल्या रविवारपासून ही सेवा दर रविवारी बंद ठेवली जाणार आहे.

खास महिलांसाठी जागतिक महिला दिनापासून ‘तेजस्विनी’ ही बससेवा सुरु करण्यात आली होती. नवीन मिडी बसच्या माध्यमातून एकुण ८ मार्गांवर ३० बसेसमार्फत २१८ फेऱ्यांद्वारे ही सेवा दिली जात आहे. तेजस्विनी बससेवा सुरू झाल्यानंतर महिलांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. बहुतेक महिला नोकरदार किंवा विद्यार्थिनी असल्यामुळे तेजस्विनीला सुट्टीच्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळत नसतो. ८ मार्च ते ७ एप्रिल या महिनाभरात सुमारे २ लाख ३ हजार महिला प्रवाशांना विशेष बससेवेतून प्रवास केला आहे. रविवारी शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालये तसेच अनेक खासगी कार्यालयांना सुट्टी असल्याने सर्वच बसेसचा कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे रविवारी पीएमपीकडून तुलनेने कमी बस मार्गावर सोडल्या जातात. बस मोकळ्या धावत असल्याने असल्याने पीएमपीला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. सुट्टीच्या दिवशी बहुतेक महिला इतर बसेसने प्रवास करतात. त्यामुळे तेजस्विनी बसेसची वाट कोणी पाहत नसल्याने या बसला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महिलांना दर रविवारी सामान्य बसनेच प्रवास करावा लागणार आहे.