बंगालमध्ये भीषण स्फोट ९ ठार

मृतदेह उडून शेजारच्या तलावात पडले; आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता

मदिनापूर ।

पश्चिम बंगालमधील ईग्रा या पूर्व मिदनापूरच्या विभागात एका बेकायदेशीर फटाके निर्मिती कारखान्यात स्फोट झाला. झालेला स्फोट इतका जोरदार होता की कामगारांचे मृतदेह जवळपासच्या दोन तलावात आणि गावाच्या रस्त्यावर उडाले. स्फोटाच्या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेले पोलीस स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह गोळा करताना दिसले. तसेच तलावातूनही मृतदेह काढण्याची मोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत नऊ मृतदेहांची ओळख पटली असून आणखी मृतदेह सापडण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

नक्की काय घडलं?

मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व काही सुरळीत होते. इतर दिवसांप्रमाणेच इग्रा येथील ब्लॉक क्रमांक १ मधील सहारा ग्रामपंचायत क्षेत्रातील खडीकुल गावात कारखाना सुरू होता. दुपारी बाराच्या सुमारास तृणमूल काँग्रेसचे नेते कृष्णपद बाग उर्फ भानू बाग यांच्या बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची चर्चा सुरू झाली. संपूर्ण गावात दहशत निर्माण केल्याने त्यांच्याविरोधात कोणीही बोलण्याचे धाडस दाखवले नव्हते.