फेसबुक, मोबाईल कंपनी ठरली तपासात महत्वाचा दुवा ; लाखो रुपयात फसवणूक करणार्या मोहम्मद कलिमोद्दीन विरोधात होता रोष
जळगाव – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंधेला देशातील प्रमुख पाच मोठ्या शहरांमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची धमकीची पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाल्याने जिल्हा पोलीस दलासह सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा जिल्हा पोलीस दलाने फेसबुक तसेच मोबाईल कंपन्यांची मदत घेवून अवघ्या पाच दिवसात छडा लावला आहे. रिजार्च व्यवसाय भागीदार असतानाही मोहम्मद कलीमोद्दीन ने विश्वासघात करुन 17 लाखांत केलेल्या फसवणूकीचा बदला घेण्यासाठी व पोलिसांनी फसवणूक करणार्या संशयितांना तातडीने अटक करावी म्हणून, फिर्यादीनेच मोहम्मदचे फेसबुक अकाऊंट हॅक करुन त्यावरुन धमकीची पोस्ट टाकण्याची शक्कल लढविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी फसवणूक प्रकरणात फिर्यादी असलेल्या अमान इरफान अन्सारी रा. फातीमा नगर, एमआयडीसी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे. जामीनपात्र गुन्हा असल्याने ताब्यात घेवून नोटीस देवून त्याला सोडून देण्यात आले आहे. मोहम्मद कलीमोद्दीनला अटक करा, अशी विनवण्याही त्याने चौकशीत पोलीस अधिकार्यांकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
काय होती फेसबुकवरील पोस्ट
22 मे रोजी फेसबकुवरील अतिया रिचार्ज या अकाउंटवर टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा असून, पोस्टमध्ये संशयिताने स्वतःचे नाव मोहम्मद कलीमद्दीन खान दिले होते. तसेच तो स्वतःला ‘जैश ए मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेचा सदस्य म्हणवून घेत आहे. पाच मोठ्या शहरांसह पंतप्रधान कार्यालय किंवा अन्यत्र कुठे काहीही होऊ शकते, अशी धमकी देत सरकारने आम्हाला पकडून दाखवावे, अन्यथा सर्वनाश स्वतःच्या डोळ्यांना पाहावा, असेही पोस्टमध्ये म्हटले होते. फेसबुकवरुन धमकीची पोस्ट पडताच गुप्तचर यंत्रणांसह जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस उपअधीक्षकांनी तातडीने गुप्तचर विभागाच्या कर्मचार्यांना बोलावून घेत त्यांच्याकडूनही माहिती जाणून घेवून मध्यप्रदेश, इंदोरसह ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यात येवून घटनेची व प्रकाराची माहिती देण्यात आली होती.
फेसबुकच्या मदतीने हाती लागले धागेदारेे
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी गंभीर प्रकाराची दखल घेत अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना तातडीने तपासाचे आदेश दिले होते. डॉ. निलाभ रोहन यांनी पोस्ट टाकणार्याचा शोध घेण्यासाठी फेसबुक कंपनीला पत्र व्यवहार केला होता. तसेच स्वतः फोनवरुन संपर्क साधून तत्काळ माहिती देण्याचे कळविले होते. त्यानुसार फेसबुक कंपनीने दोन दिवसात पोस्ट टाकल्याबाबत आयपी अॅड्रेस शोधला. या अॅड्रेसनुसार कोणत्या ठिकाणचे इंटरनेट वापरले, त्याबाबत खोलात तपास केल्यावर मेहरुण परिसरातील एका ठिकाणाच्या वायफायचा मोबाईलवरुन पोस्ट टाकण्यासाठी वापर केल्याचे समोर आले.
अन् लागला प्रकरणाचा छडा
धमकीची पोस्ट टाकण्यासाठी ज्या आयपी अॅड्रेस निष्पन्न झाला. मात्र कोणत्या मोबाईल क्रमाकांवरुन वायफाय वापरुन ही पोस्ट टाकण्यात आली, त्यासाठी पोलीस विभागातर्फे भारत दूर संचार विभाग व रिलायन्स जीवो कंपनीला पत्रव्यवहार केला होता. कंपन्यांनी आयपी अॅड्रेसवरुन मोबाईल क्रमांक शोधून काढले. मोबाईल क्रमांक हा मुस्ताक अन्सारी नामक व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत त्यांनी मोबाईल नंबर माझ्या नावावर आहे मात्र त्याचा वापर पुतण्या अमान इरफान अन्सारी करत असल्याचे त्यांनी सांगितले अन् संशतियाताच्या शोधासह संपूर्ण प्रकरणाचा उलगडा ठरला. फेसबुक कंपनी व मोबाईल कंपन्या गुन्ह्यात तपासात महत्वाच्या दुवा ठरल्या.
पोस्ट टाकल्यावर मोबाईल, सीमकार्ड केले होते नष्ट
अमान अन्सारीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याने फेसबुकवरुन धमकीची पोस्ट टाकल्याची कबूली दिली. व पोस्ट का टाकली तसेच गुन्ह्याचा घटनाक्रम त्याने सांगितला. समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन व इरशाद बी समीर शेख दोघे रा. इंदोर यांच्या सोबत मी रिजार्चचा व्यवसाय केला. काही दिवसांनी त्यांनी विश्वासघात करुन माझ्यासह एकाला एकूण 17 लाख 45 हजार 324 रुपयांत गंडा घालून दोघे फरार झाले होते. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात 10 जानेवारी 2019 मध्ये गुन्हा दाखल आहे. त्यांना पोलिसांनी अटक करावी, व माझी केलेल्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी धमकीची पोस्ट तयार केली. व्यवसायात त्याच्या सोबत असताना अतिया रिजार्च या फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड माहिती होता. दोघांना अडविण्यासाठी धमकीची पोस्टमध्ये मोहम्मद कलीमोद्दीनसह त्याची पत्नी इरशाद यांची नावे टाकून ते दहशतवादी असल्याचा ÷उल्लेख केला. व मोहम्मद कलिमोद्दीनच्या नावाने फेसबुकवर असलेल्या अतिया रिचार्ज या अकाऊंटवरुन पोस्ट व्हायरल केल्याचे अमानने चौकशीत पोलिसांना सांगितले. पोस्ट टाकण्यासाठी वापरलेल्या मोबाईलच्या आयएमईआयवरुन तपासात नाव समोर येईल म्हणून अमानने मोबाईलसह सीमकार्डच नष्ट केल्याचेही तपासात समोर आले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अमान इरफान पिंजारी विरोधात आयटी अॅक्ट कलम 66 सी 66 डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह सायबर पोलीस ठाण्याचे प्रविण वाघ, सपकाळे, पोलीस उपनिरिक्षक नेमाणे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. व त्यामुळे अवघ्या पाचच दिवसात देशाला हादरवून घटनेचा टाकणार्या उलगडा झला.
सायबर पोलिसांनी पैसे खाल्यानेच संशयित फरार
तपासाचा उलगडा झाल्यावर चौकशीत अमान अन्सारीने उलट पोलिसांवरच रोष व्यक्त केला. दोन दिवसात जर पोलीस माझ्यापर्यंत पोहचू शकतात तर मग फसवणूक करणार्या मोहम्मद कलीमोद्दीनसह त्याच्या पत्नीपर्यंंत कसे पोहचत नाही, असा सवालही केला. संशयित राहत असलेला पत्त्यासह सर्व माहिती दिली. मात्र सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी आरोपींकडून पैसे घेतले. व त्यामुळे ते फरार असल्याचे सांगत पोलीस प्रशासनावर रोष केला. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांची चौकशी करुन झाडाझडती घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
सायबर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. यातील फिर्यादी अमान इरफान अन्सारी याने फसवणूक करणार्यांना पोलिसांनी अटक करावी, त्यांना अडविण्यासाठी पोस्ट टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले. सायबर पोलीस ठाण्यात अमान अन्सारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामीनपात्र गुन्हा असल्याने जामीनावर सोडण्यात आले असून त्याला नोटीस देण्यात आली आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या कुठल्याच पोस्टवर विश्वास ठेवू नये, देशात कुठेच स्फोट होणार नसून सूडापोटी तसेच रागातून ही पोस्ट टाकण्यात आली असून धमकी खोटी असून ती व्हायरल करु नये असे जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे.- डॉ. निलाभ रोहन, पोलीस उपअधीक्षक