नवी दिल्ली: पाकिस्तानकडून भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याने लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक गट मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून सैन्य तैनात करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावरुन परतल्यानंतर लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात केले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डोवाल यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचं सांगण्यात येत आहे.
कलम 35 ए हटविण्यावरुन राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. कलम 35 ए हटविण्यावरुन फुटिरतावादी नेत्यांनी विरोध केला आहे. पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनीही कलम 35 ए म्हणजे बॉम्ब आहे. जर तुम्ही त्याला हात लावाल तर स्फोट होईल आणि या स्फोटात तुम्ही जळून खाक व्हाल असा इशारा दिला आहे.