श्रीनगर : पाकिस्तानकडून सिमेजवळ कुरघोडीचा प्रकार केला जात असतो. आज सकाळी पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. दरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली आहे. भारतीय जवानांनी 22 दहशतवादी आणि 11 पाकिस्तानी सैन्याचा खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे. सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे सात तळ उद्धवस्त केल्याचे बोलले जात आहे.
सीमेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार केला. पाककडून केल्या जाणाऱ्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यात भारतीय लष्कराने सीमेलगत पाकच्या हद्दीत असलेली सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या करावाईत दोन भारतीय जवानांना वीरमरण आले. तर एका नागरिकाचाही मृत्यु झाला. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या छावण्यांना लक्ष्य करण्यासाठी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याची तळ देखील उद्धवस्त झाली आहेत.