म्हणूनच ‘या’ नेत्यांमागे ईडी लागते- प्रवीण दरेकर

जनशक्ती नंदुरबार | रवींद्र चौव्हाण |  बंद पडलेले कारखाने आणि त्यांची जमीन कवडीमोल भावात विकत घ्यायची आणि तेच कारखाने पुन्हा सुरू करायचे असा उद्योग महाविकास आघाडीमधील सत्ताधारी नेत्यांनी सुरू केलाय, त्यामुळे त्यांच्या मागे ईडी सारखी यंत्रणा लागत असते,असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.
शहादा तालुक्यातील सातपुडा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यासाठी दरेकर हे नंदुरबार जिल्ह्यात आले होते, पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आघाडी सरकारसाठी कोरोना संकट म्हणजे जणू पर्वणीच ठरली होती. या काळात आदिवासींना खावटी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र या लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही पैसे पडलेले नाही. गेल्या दोन वर्षात आघाडी सरकारने आदिवासींच्या हिताचे कोणतेही काम केले नाही. उलटपक्षी बंद पडलेले कारखाने आणि त्यांची जमीन कमी भावात विकत घेऊन ते कारखाने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे ईडी सारख्या यंत्रणा अशा नेत्यांच्या मागे लागल्या असाही टोमणा त्यांनी मारला. एकंदरीत महाराष्ट्रातील जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला असून त्यामुळे भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेत येईल असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला आमदार राजेश पाडवी, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते.