सेना-भाजपात पुन्हा कलगीतुरा

0

मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा कलगीतुरा निर्माण झाला आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी सेना- भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे मात्र पालघर आणि गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अद्यापही एकमत झालेले नाही. दोन्ही पक्षात अद्याप खलबते सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचा जागा वाटप निशित झाले आहे. तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, तर तीन जागांवर भाजप उमेदवार देणार आहे.

नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार आहेत, तर उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप लढणार आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड मधून सुरेश धस, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून प्रदेश संघटन सचिव रामदास आंबटकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अमरावतीतून प्रवीण पोटे पाटील यांचा अर्ज दाखल झाला आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख उद्या म्हणजे 3 मे असून 21 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दुसरीकडे, पालघर आणि गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीवर अद्याप निर्णय झालेला नाही. भाजपला पाठिंबा द्यायचा की तटस्थ राहायचं याबाबत शिवसेनेत खल सुरु आहे.