भुसावळातील लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित

0

लाभार्थींना लाभ न मिळाल्यास माजी नगरसेवक दीपक धांडे यांचा आंदोलनाचा इशारा

भुसावळ: पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल भागातील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल उभारता यावे यासाठी शासनाकडून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेंतर्गत 2017-18 मध्ये भुसावळ नगरपालिकेकडून पात्र लाभार्थींकडून अर्ज भरण्यात आले होते परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापपर्यंत शहरातील लाभार्थींना घरकुल बांधणीसाठी कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मदत करण्यात आलेली नाही या प्रकाराला पालिका प्रशासनाचे ढिसाळ नियोजन जवाबदार असून पात्र लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा व लाभ न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

पहिल्या टप्प्याचे अनुदान पालिकेला प्राप्त

लोकसभा निवडणुकांपूर्वी पालिका प्रशासनाने शहरातील जवपळपास 350 हून अधिक लाभार्थींची घरकुलांची यादी प्रसिध्द केली होती. या कामी शासनाकडून जवळपास एक कोटी 44 लाख रूपयांचे अनुदान पहिल्या टप्प्यात पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे परंतु पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गरजू लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित आहेत. शहरातील पात्र लाभार्थींनी संबंधीत विभागातील अधिकारी यांच्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. या कामासाठी लाभार्थींना पाच हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागला आहे. यंदा सर्वत्र पावसाने थैमान माजविले आहे त्यामुळे गोरगरीबांच्या पडक्या घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. यातील बहुतांश कुटुंबीय झोपडपट्टीत राहणारे आहेत परंतु पालिका प्रशासनाच्या उदासीन भुमिकेमुळे लाभार्थींना पडक्या घरांमध्ये व झोपडीमध्ये राहण्याची वेळ आली आहे. घरकुल योजनेचा संबंधीत लाभार्थींना वेळेवर लाभ न मुख्याधिकारी यांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दीपक धांडे यांनी दिला आहे.