नवीन काही न करता आहे ते उद्ध्वस्त करणे मोदी सरकाचे काम: राहुल गांधी

0

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सध्या दूर असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा सरकारला नव्याने काहीही निर्माण करता येत नाही, उलट जे अनेक दशकांपासून कठोर परिश्रमाने तयार केले गेले आहे, ते काम उद्ध्वस्त करता येते, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ट्विट करत राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली.

राहुल गांधी यांनी प्रसिद्ध झालेल्या चार बातम्यांच्या मथळ्यांची कात्रण एक जीआयएफ इमेजद्वारे ट्विटरवरुन शेअर केली आहे. यामध्ये लार्सन अॅण्ड टुब्रोचे (एल अँड टी) अध्यक्ष ए. एम. नाईक यांच्या भारतीय अर्थव्यवस्थेवरील टिपण्णीचा समावेश आहे, भारतीय रेल्वेचे खासगीकरणाकडे मार्गक्रमण, देशातील ऑटोमोबाईल क्षेत्र मंदावले आहे तसेच बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन सरकारी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासही पैसा नाही, या मथळ्यांचा यात समावेश आहे.

राहुल गांधी यांच्या या ताज्या टीकेपूर्वी भाजपाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. आपला पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर अडचणीत असताना अध्यक्षपदाचा राजीनामा देत रणांगणातून पळून गेल्याचा आरोप चौहान यांनी राहुल गांधींवर केला होता. तसेच ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केला ते निवडणुकीनंतर कुठेच दिसले नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते.