भाजपने कॉंग्रेसला आत्मसात केले -शिवसेना

0

बंगळूरू-बंगळुरुतील बोगस मतदार ओळखपत्र प्रकरणावरुन शिवसेनेने भाजपाला फटकारले आहे. पूर्वी जे काँग्रेस करायची ते आता भाजपा करत असून भाजपाने काँग्रेसला आत्मसात केले. भाजपाने काँग्रेसला स्वतःमध्ये विलीन करुन घेतले. हा विजय काँग्रेसचाच असून फक्त मेकअप करुन ते भाजपात आले, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

बोगस मतदार प्रकरणावरून भाष्य

शुक्रवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. बंगळुरुत बोगस मतदार ओळखपत्र सापडल्याच्या पार्श्वभूमीवर ही टीका करण्यात आली आहे. बंगळुरुत १० हजार बोगस मतदार ओळखपत्र सापडले असून या व्होटर फर्जीवाडावरुन निवडणुकीची खाली घसरलेली पातळी दिसते. पैशांचा वारेमाप वापर सुरु असून भाजपाकडे इतका पैसा कुठून येतो, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करतील

कोणतीही निवडणूक आली की नोटांचा प्रवाह धो धो वाहू लागतो. नोटछपाईचे उद्योग ‘मुद्रा बँके’ने सुरु केले आहेत. हे पूर्वी काँग्रेस करायची. हीच कला आता भाजपाने आत्मसात केली. कर्नाटकमधील भाजपाचा जाहिरनामाही काँग्रेसकडून कॉपी केल्याचा आरोप होत आहे, याकडेही शिवसेनेने लक्ष वेधले. वाट्टेल ते करुन निवडणूक जिंकायची या काँग्रेसी धोरणावर भाजपा पावले टाकत आहे.

शेवटी कॉंग्रेसचा विजय

भाजपाने काँग्रेसचा पराभव केला नाही, तर काँग्रेसला स्वतःमध्ये विलीन करून घेतले आणि विजय मिळवला. म्हणजे शेवटी हा काँग्रेसचा विजयच आहे. फक्त मेकअप करून ते भाजपात आले व त्यांच्या बळावर भाजपा सत्तेवर आली. काँगेसमुक्त भारतासाठी भाजपाने केलेल्या या त्यागाचे मोल अनमोल आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

हा दावा करताना अग्रलेखात त्रिपुरा व महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाचा दाखला देण्यात आला आहे. पालघर पोटनिवडणुकीत भाजपाचा काँग्रेसी आत्माराम जागा झाला व त्यांनी काँग्रेसच्या राजेंद्र गावीत यांना भाजपात घेऊन काँग्रेसला पालघरातून मुक्त केले, अशी टीका शिवसेनेने केली.