निर्मल ब्रॅन्डची नक्कल करुन शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या बोगस कंपनीला ठोकले टाळे

 मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशातुन कार्यवाही

पाचोरा ( प्रतिनिधी ) निर्मल सिडस्‌ प्रा. लि. ही कंपनी बि-बियाणे क्षेत्रातील एक नामांकीत कंपनी असुन तिचा देशभर विस्तार आहे. उत्कृष्ट दर्जेदार व गुणवत्तापुर्ण बियाण्यांमुळे ती शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या लोकप्रियतेचा फायदा घेऊन हरियाणा राज्यातील कर्नाल येथे एका बनावट व्यावसायीकाने निर्मल ब्रान्डची, व्यापारी चिन्हाची, नावाची नक्कल करुन

“न्यू निर्मल सिडस” या नावाने कंपनी सुरु केली. बाजारात बोगस बियाण्यांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणुक केली असता त्याविरुध्द याचिका दाखल केल्या नंतर मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी त्याविरूध्द अॅड इंटेरिम ऑर्डर पारीत करुन सदर बोगस कंपनी विरुध्द कार्यवाही करुन तिने उत्पादित केलेल्या बनावट मालाला सील करण्यात आले.

पाचोरा येथील निर्मल सिडस्‌ प्रा. लि. ही कंपनी मागील साडेतीन दशकांपासुन शेतकऱ्यांच्या सेवेत असुन तिचा ब्रान्ड व लौकिक देशभर पसरला आहे. “निर्मल” हे व्यापारी चिन्ह सुरुवातीपासुनच अधिकृत व नोंदणीकृत असुन ते कोणालाही वापरता येत नाही. परंतु कर्नाल (हरियाणा) येथे “निर्मल” या चिन्हाचा वापर करुन नावाची नक्कल करुन बोगस व डुप्लीकेट बियाणे विक्री करतांना आढळुन आले होते. अशा निकृष्ट दर्जाच्या बनावट व उल्लंघन करणाऱ्या मालाची विक्री करुन शेतकरी व निष्पाप जनतेची फसवणुक करत असल्याचे आढळुन आले होते.

ही बाब लक्षात येताच पाचोरा येथील निर्मल सिडस्‌ कंपनीने या फसवणुकीविरुध्द मा. उच्च न्यायालयात धाव घेतली आणि ट्रेडमार्क अॅक्ट अंतर्गत याचिका दाखल केली. त्यानंतर मा. उच्च न्यायालयाने निर्मल सिडस्‌ कंपनीचे म्हणणे ऐकुण घेतल्यानंतर सर्व नोंदी, पुरावे, कागदपत्रांची तपासणी करुन व्यापारी नाव, ट्रेडमार्क, लेबल या अधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या वस्तुंची विक्री करण्यापासुन प्रतिबंधीत करणारा अंतरीम मनाई हुकुम जारी केला जो व्यापार चिन्हाच्या नावाशी फसव्या रितीने साम्य असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे कर्नाल (हरियाणा) येथील ठिकाणावर छापा टाकण्यासाठी स्थानिक कमीशनर यांची नियुक्ती करुन दि. ३ जुलै २०२३ रोजी पोलिसांसमक्ष छापे टाकुन उल्लंघन करणाऱ्या वस्तु, पॅकेजिंग साहित्य जप्त करुन सील केले.

मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी या आदेशात आपले अभिमत नोंदवतांना सांगितले की, या केसमध्ये प्रथम दर्शनी असे दिसुन येते की, पाचोरा येथील निर्मल सिडस्‌ ही कंपनी आणि तिचा ब्रान्ड “निर्मल” हे चिन्ह संरक्षित असुन कायदेशीररित्या नोंदणीकृत आहे. त्याचा वापर अशा रितीने कोणालाही करता येणार नाही. परंतु कर्नाल (हरियाणा) येथील कंपनीने “निर्मल” या चिन्हाचा केलेला वापर हा योगायोग असु शकत नाही असे मत व्यक्त करतांना मा. न्यायालयाने पुढे म्हटले आहे की अशा केसेस मध्ये न्यायालयाने प्रोप्रायटरच्या अधिकाराचे फक्त रक्षण करुन चालणार नाही त्याच बरोबर ग्राहकांचा फायदा व जनतेच्या हिताचे सुध्दा रक्षण व्हायला पाहिजे असे सांगुण पाचोरा येथील निर्मल सिडस्‌चे मोठे नुकसान झाले असुन ते पैशाने भरुन निघणार नाही असे मत मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी नोंदविले.

निर्मल सिडस् प्रा. लि. ही कंपनी त्यांच्या बौध्दिक संपदा, व्यापारी चिन्ह व गुणाबाबत खुप गंभीर आहे. निर्मल सिडस्‌चे नाव, व्यापारी चिन्ह व गुणासारखे कोणतेही उत्पादन विकताना व त्याची नक्कल करताना कोणीही आढळल्यास त्याच्या विरूध्द दिवाणी व फौजदारी कार्यवाही केली जाईल. ज्या ज्या ठिकाणी निर्मल सिडस्‌च्या इतर उत्पादनांचे नाव व नक्कल करीत असल्याचे निदर्शनात आले आहे त्यांच्याविरुध्द सुध्दा कंपनीने कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. अशा बनावट करणाऱ्या ठिकाणी भारतात कुठेही छापे टाकुन, जप्ती करुन गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल असे कंपनीने कळविले आहे.