‘देवाची करणी’ म्हणून चीनने आपली जमिनी बळकावली का?; राहुल गांधींचा सवाल

0

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन संबंध कमालीचे ताणले गेले आहे. चीनने भारताच्या भूभागावर ताबा मिळविल्याचे बोलले जात आहे. पूर्व लडाखमध्ये तणावाचे वातावरण आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर काठावर गेल्या ४८ तासांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) मोठय़ा प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली असून, भारतानेही तिथे मोठय़ा प्रमाणात जवान तैनात केले आहेत. दरम्यान यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला आहे. चीनने भारताची जमीन बळकावली आहे, ती परत घेण्यासाठी मोदी सरकार काय करणार? की देवाची करणी म्हणून सोडून देणार? असा सवाल राहुल गांधी केला आहे. ट्वीटरवरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींकडून सातत्याने अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारला लक्ष केले जात आहे. जीडीपी घसरल्याने मोदी सरकारवर अधिक टीका होऊ लागली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थव्यवस्थेवर भाष्य करतांना अर्थव्यवस्था ढासळली ही देवाची करणी होती असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा आधार घेत राहुल गांधींनी टीका केली आहे.

२७ ऑगस्ट रोजी झालेल्या वस्तू व सेवा कर परिषदेमध्ये निर्मला सितारामन यांनी अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करताना अ‍ॅक्ट ऑफ गॉडचा उल्लेख केला होता. करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (अ‍ॅक्ट ऑफ गॉड) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे सांगितले होते. या वक्तव्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर आणि केंद्राच्या आर्थिक धोरणांवर टीका केल्याचे पहायाला मिळालं होतं.