मुंबई: राज्य सरकार दोन वर्षात तब्बल ७२ हजार सरकारी पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ३६ हजार यावर्षी तर ३६ हजारपदे पुढील वर्षी भरण्यात येतील. मात्र या भरतीप्रक्रियेत सरकारने नवी अट घातली आहे.
ही पदे भरताना शिक्षण सेवकाच्या धर्तीवर पहिली पाच वर्षे मानधनावर भरली जातील. त्यानंतर पात्रता आणि कामगिरी बघून ती नियमित केली जातील. जसे सध्या शिक्षण सेवकांसाठी तीन वर्षे मानधनाची अट आहे, ती आता ५ वर्षे असेल. तशीच नव्याने भरण्यात येणारी यावर्षीची ३६ हजार पदं पहिली पाच वर्षे मानधन तत्त्वावर असतील. त्यानंतर ती नियमित केली जातील.
राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात तसा उल्लेख आहे. राज्यस्तरीय संवर्गातील पदे भरताना पदोन्नती श्रेणीतील सर्वात खालचे पद तसेच जिल्हास्तरावरील पदे ही शिक्षण सेवक, कृषी सेवक आणि ग्रामसेवकांच्या धर्तीवर प्रथम पाच वर्षांसाठी मानधनावर भरण्यात यावीत आणि त्यानंतर पात्रता व कामगिरी तपासून त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे.