मारहाण भोवली ; दोघा आरोपींना न्यायालयाने सुनावला दंड

0
भुसावळ- न्यायालयात दाखल खटला मागे घ्यावा या कारणावरून तक्रारदाराच्या डोक्यात बिअरची बाटली व वीट मारल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोघा आरोपींना भुसावळ सत्र न्यायालयाचे न्या.एस.एल.वैद्य यांनी प्रत्येक एक हजारांचा दंड सुनावला तर पाच हजारांच्या हमी बॉण्डवर सुटका करण्यात आली.
तक्रारदार महेंद्र बाबूराव घरवाढवे (रा.रेल्वे हॉस्पीटलमागे, समता नगर, भुसावळ) यांनी संशयीत आरोपी दिनकर वानखेडे यांच्याकडून घर खरेदी करूनही ते नावावर करीत नसल्याने त्यांनी खटला दाखल केला होता व हा खटला मागे घ्यावा यासाठी आरोपी साहेबराव धर्मा पाटील (60, चांदमारी चाळ, भुसावळ) व दिनकर नारायण वानखेडे (75, आंबेडकर नगर, पाण्याच्या टाकीजवळ, भुसावळ) यांनी 2 सप्टेंबर 2015 रोजी समता नगर रीक्षा स्टॉपजवळ बिअरची बाटली व अर्धवट विटेच्या तुकड्याने मारहाण केली होती.
या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे, एएसआय प्रकाश निकम व प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक गजानन काळे यांनी गुन्ह्याचा तपास केला. चार साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीतर्फे अ‍ॅड.बी.पी.पाटील यांनी काम पाहिले. खटल्याकामी पैरवी अधिकारी आसीफ खान व सुनील खोडपे यांनी सहकार्य केले.