वरणगांवातील मुख्य रस्त्यावर झालेले अतिक्रमण त्वरीत काढावे – सुनिल काळे

रस्ता रुंदीकरण नाही झाल्यास महाराष्ट्र दिनी आंदोलन 

वरणगांव | प्रतिनिधी वरणगांव बसस्थानक चौक ते भोगावती नदी पर्यंत शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील बसस्थानक चौक ते रामपेठ चौफुली पर्यंत अतिक्रमण झाले असून यामध्ये या मार्गालगत सुरु असलेल्या व्यापारी संकुलाच्या बांधकाम धारक मालकाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे . यामुळे नगर परिषदेने मोजमाप करून हा मार्ग मोकळा करावा अन्यथा महाराष्टू दिनाच्या दिवशी रितसर आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी दिला आहे .

वरणगांव शहराच्या विकासासाठी व सुशोभीकरणासाठी गेल्या काही महिन्यांपासुन भाजपातर्फे प्रयत्न सुरु असुन यामध्ये बसस्थानक चौक ते रेल्वे स्थानकापर्यंतच्या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण, भोगावती नदी पात्रात संरक्षण भिंत, बसस्थानक चौकात १०५ फुटावर डौलाने फडकणारा तिरंगा ध्वज, भोगावती नदी पात्रालगतच्या पुरातन गढीवर उभारण्यात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व त्याचे शिवतिर्थ नामकरण, विश्राम गृहाच्या लगत व्यापारी संकुल असे विविध कामे झाले आहेत . (यातील काही कामे अर्धवट व नित्कृष्ठ दर्जाची होत असल्याचा आरोप होत आहे तो भाग वेगळा ) मात्र, सर्वाधिक महत्वाचा प्रश्न म्हणजे बसस्थानक चौक ते रामपेठ चौफुली पर्यंतच्या मुख्य मार्गावर होत असलेल्या अतिक्रमणाचा या मार्गावर मनमानी पद्धतीने एका खासगी व्यापार्‍याने सुरु केलेले अवाढव्य व्यापारी संकुलाचे बांधकाम . या महाशय व्यापार्‍याने संकुलाचे बांधकाम करतांना अयोध्या नगर कडुन येणाऱ्या नैसर्गिक पाण्याच्या नालाच्या प्रवाहाचा मार्ग बदलवून त्याचे गटारीत रुपांतर केले आहे . इतकेच नव्हे तर मुख्य रस्त्यापर्यंत बांधकामाचा विस्तार वाढवल्याने आयुध निर्माणीकडे जाणाऱ्या रिक्षा थांबा असलेल्या रिक्षा धारकांना नाईलाजाने आपल्या रिक्षा मुख्य रस्त्याच्या अगदी कडेला उभ्या कराव्या लागत आहे . यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे . यामुळे वाहन धारक व सर्व सामान्य नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे .

 

रस्ता रुंदीकरण नाही झाल्यास आंदोलन

बसस्थानक चौक ते रामपेठ चौफुली पर्यंतच्या मार्गाचे रितसर मोजमाप करून या भागातील अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावे . तसेच यामार्गाचे तातडीने रुंदीकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , सार्वजनिक बांधकाम विभाग व मंत्री महोदयांना माजी नगराध्यक्ष सुनिल काळे, भाजपा पदाधिकारीतसेच त्रस्त झालेल्या रिक्षा चालकांनी दिले आहे . रस्ता तातडीने रुंदीकरण नाही झाल्यास महाराष्ट्र दिनाच्या दिवशी (दि.१ मे ) आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे . यामुळे प्रशासन कठोर भुमिका घेवून मार्ग रुंदीकरण करणार किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

सार्वजनिक बांधकाम विभागाचा फलकही झाला गायब

या मार्गावरून भुसावळ ते सावतर निंभोरा बस नियमीत जाते . या मार्गावरील परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने बोदवड, मुक्ताईनगर व भुसावळकडे जाणाऱ्या दिशादर्शक मार्गाचा कि.मी. अंतराचा फलक लावलेला होता . हा फलकही आता नुकताच दिसेनासा झाला असुन हा फलक बांधकाम करणाऱ्या व्यावसायीक व्यापार्‍यानेच आपल्या घशात घातल्याची चर्चा सुरू आहे . यामुळे सार्व. बांधकाम विभागाने चौकशी करून फलक चोरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे .