थायलंडच्या गुहेमध्ये अडकलेल्यांना सोडविण्यासाठी महाराष्ट्रातून गेले ‘हे’ इंजिनीअर

0

मुंबई-थायलंडमध्ये गुहेमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी जगभरातून मदतीचा हात पुढे येत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचाही सहभाग आहे. किर्लोस्कर कंपनीमध्ये इंजिनीअर प्रसाद कुलकर्णी थायलंडला रवाना झाले आहेत. डिझाईन हेड असलेले व पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपांमध्ये तज्ज्ञ असलेले प्रसाद गुहेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी अडसर ठरलेले पाणी काढण्यासाठी थायलंड सरकारला मदत करत आहेत.

प्रसाद यांचे बंधू किशोर कुलकर्णी यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना सांगितले की, प्रसाद किर्लोस्कर कंपनीत इंजिनीअर असून प्रतिकूल परिस्थितीमध्ये पंपांचं काम कसं करावं, मुलभूत सोयी नसताना पंप वापरायचे असतील तर काय करायला हवं आदी तांत्रिक बाबींमधले ते तज्ज्ञ आहेत. त्यामुळे उरलेल्या पाच विद्यार्थ्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात प्रसाद यांची मदत होईल असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

थायलंडमधे एका दुर्गम व सुमारे दहा किमी लांबी असलेल्या गुहेत बारा मुले व त्यांचा फुटबॉलचा प्रशिक्षक अपघाताने 23 जूनपासून अडकले आहेत. हे 13 जण बेपत्ता झाले होते, परंतु बाहेर आढळलेल्या सायकलींवरून ते आत अडकल्याचे समजले. नंतर ते सगळे जिवंत असल्याचे व अचानक आलेल्या नदीच्या पुरामुळे ते गुहेत अडकल्याचे निष्पन्न झाले. थायलंड सरकारने लगेचच आपत्कालीन यंत्रणा कामाला लावली व मदतकार्य सुरू केले. दुर्दैवानं एका माजी सील कमांडोला आपला जीव गमवावा लागला आहे. आत्तापर्यंत आठ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून पाच जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आतमध्ये पुरेसा ऑक्सिजन व खाद्यपदार्थ पोचवण्यात आले असून त्यांच्या जीवाला धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. पुरामुळे फुगलेली नदी व तिच्या पाण्याचे प्रवाह हीच एक अडचण असून तिच्यावर मात करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामधील मिरजेतील किर्लोस्कर ब्रदर्सचे प्रसाद कुलकर्णी व त्यांचा सहकारी मोलाची भूमिका बजावत असून बाकिच्या पाच जणांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळेल अशी आशा आहे.

किर्लोस्कर ब्रदर्सची थायलंडमध्येही शाखा असून त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला होता. थायलंड सरकारनेही आभार मानत भारत सरकारला विनंती करून किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लडपंप्स पाठवण्यास सांगितले. भारत सरकारने व केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली. थायलंडला पोहोचताच या टीमने लगोलाग कामास सुरूवात केली आणि फ्लड पंप्स सुरू केले आहेत. पाणी उपसा झाल्याचा सुखद परीणाम असा झाला की रविवारी चार मुलांची तर सोमवारी आणखी चार मुलांची गुहेतून सुखरूप सुटका झाली असे किशोर कुलकर्णी यांनी सांगितले.