iमुंबई: आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी नालेसफाई बाबत मुंबई मनपावर कडक ताशेरे ओढले आहेत. आमच्यापेक्षा आरजे मलिष्का नशीबवान आहे. कारण मुंबईच्या नालेसफाईबाबत तिने एक गाणं केलं त्यानंतर प्रशासकीय अधिकारी तिला घेऊन नाल्यांवर गेले. आतापर्यंत मुंबई मनपा, प्रशासनाने आमदारांना कधीही नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी नेलं नाही. मात्र मलिष्काला घेऊन गेले त्यामुळे आमच्यापेक्षा ती भाग्यवान आहे असा टोला आव्हाड यांनी लगावला.
मुंबईतील सगळे नाले बिल्डर्सनी छोटे करून टाकले, या गोष्टीला जबाबदार कोण? दरवेळी प्रचंड पाऊस मुंबई जलमय ही बातमी आपण किती वर्षे वाचणार आहोत एका पावसाने उद्धवस्त होणारं जीवन आपण जर लोकांना देत असू तर आपली नैतिक जबाबदारी काय? मलिष्का एक गाणं करते ‘मुंबई तुझा माझ्यावर भरवसा नाही का? तिला नालेसफाईच्या आढावा घेण्यासाठी नेलं जातं, आमदारांना मात्र आयुक्त कोणताही आढावा घेण्यासाठी घेऊन जात नाही हे दुर्दैवी आहे असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस अत्यंत हुशार आहेत नालेसफाईचे टेंडर कधी काढायचे? हे त्यांना चांगले ठाऊक आहे. पावसाळ्याच्या आधी एक महिना टेंडरची प्रकिया सुरू करायची आणि पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईला सुरूवात करायची हे दरवेळीच घडतं. नालेसफाईमध्ये जेसीबी किंवा पोकलेन उतरवली जाते, तो सगळा कचरा उचलून नाल्यावर ठेवला जातो. आपण कंत्राटदाराला कितीही सांगा तो कचरा उचल म्हणून पण तो कंत्राटदार कचरा उचलत नाही. कचरा ओला आहे मी काही करू शकत नाही असे म्हणून तो कानावर हात ठेवतो मग कचऱ्याचे ढिग साठतात. मग जोरात पाऊस आला की कचऱ्याचे ढिग वाहून जातात. मग तो बिलं घ्यायला मोकळा असा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनावर निशाणा साधला आहे.