बापाने जमिनीवर आपटले चार महिन्यांच्या बाळाला

0

पिंपरी : पत्नीने घरखर्चासाठी पतीकडे पैसे मागितले. या कारणावरून चिडलेल्या दारुड्या पतीने पत्नीच्या हातात असलेले चार महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटले. हा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. शुभांगी दत्ता देशमुख (वय 22, रा. आंबेडकर नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दत्ता देशमुख (वय 34, रा. भारतनगर, पिंपरी), या निर्दयी पित्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बायकोने घरखर्च मागितला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी आणि दत्ता यांना चार महिन्यांचा मुलगा आहे. शुभांगी यांनी सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास पती दत्ता याला घरखर्चासाठी पैसे मागितले. दत्ताकडे यावेळी पैसे होते, मात्र ते पैसे त्याला दारू पिण्यासाठी हवे होते. त्यामुळे त्याने पैसे देण्यास नकार दिला. शुभांगी यांनी परत पैसे मागितले. यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. चिडलेल्या दारुड्या दत्ताने शुभांगीच्या हातात असलेले चार महिन्यांचे बाळ जमिनीवर आपटले. यामध्ये बाळ गंभीर जखमी झाले असून पुण्यातील ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलिसांनी दारुड्या पतीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.