पहिल्या पत्नीने फिल्मीस्टाईल रोखला पतीचा दुसरा विवाह
रावेर तालुक्यातील घटना ; तरुणाने कुटुंबियांना ठेवले होते अंधारात
भुसावळ प्रतिनिधी |
पहिले लग्न झालेले असताना, तसेच पत्नीला पुण्यात ठेऊन रावेरमध्ये येत दुसरे लग्न लावून घेण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखविला आहे. तेथे पहिली पत्नी अवतरल्याने दुसरे लग्न करू पाहणाऱ्या तरुणाची चारचौघात चांगलीच इज्जत निघाली. समाजातील जेष्ठ मंडळींनी मध्यस्थी करीत हा विवाह रोखला आहे.
पातोंडा जि. बऱ्हाणपूर येथील एका उच्च शिक्षित युवकाचे रावेर तालुक्यातील एका गावातील मुलीशी १२ मे रोजी लग्न निश्चित झालेले होते. हे लग्न बऱ्हाणपूर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात होणार होते. विवाहाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. पहिल्या पत्नीला पुणे येथेच सोडून नवरदेव मुलगा दुसऱ्या विवाहासाठी येथे आलेला होता. विवाह मंडपातील बोहल्यावर नवरदेव चढून वधूवरांच्या डोक्यावर अवघ्या काही मिनिटात अक्षता पडणार होत्या. मात्र नवऱ्या मुलाची पहिली पत्नी अचानक पुणे येथून येऊन लग्न मंडपात दाखल झाली. नवरदेव असलेल्या मुलाचे माझ्याशी महिनाभरापूर्वी आळंदी येथे लग्न झाल्याचा दावा तिने यावेळी लग्नमंडपात उपस्थितांसमोर केला. यामुळे लग्न मंडपात एकाच गोंधळ उडाला.याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सत्यता जाणून घेतली. लग्नासाठी आलेल्या नवरदेवाचे लग्न रोखत पोलिसांनी चौकशीसाठी नवरदेवाची वरात थेट लग्न मंडपातून पोलीस ठाण्यात आणली. चौकशी केली असता पहिल्या पत्नीने या मुलाचा पहिला विवाह माझ्याशी झाल्याची माहिती दिली. यामुळे फसवणूक करणाऱ्या नवऱ्या मुलाचे पितळ उघडे पडले. या मुलाचे गेल्या काही दिवसापासून बऱ्हाणपूर येथील दुसऱ्या समाजातील मुलीशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी महिनाभरापूर्वी एप्रिलमध्ये आळंदी येथे जाऊन विवाह लावला होता. मात्र याची माहिती मुलाने पातोंडा येथील नवरदेवाने कुटुंबियांना दिली नव्हती.
त्यामुळे कुटुंबीयांनी मुलासाठी रावेर तालुक्यातील एका गावातील स्थळ निश्चित करून विवाहाचे १२ रोजी आयोजन केले होते. तसेच पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसरा विवाह करण्याचा डाव पहिल्या पत्नीच्या जागरूकतेमुळे मोडून पडला आहे. दुसऱ्या विवाहाची डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच नवऱ्या मुलाचा प्रताप त्याच्यापहिल्या पत्नीने उघडकीस आणला. अखेर शुक्रवारी होणारा हा विवाह थांबविण्यात आला. आळंदी येथे बऱ्हाणपूर येथील रहिवासी असलेल्या मुलीशी पहिले लग्न गेल्या महिन्यात केलेले असल्याची कबुली नवरदेवाने पोलिसांना चौकशीत दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे दिली आहे.