मोदींवर कॉंग्रेस मुक्तीचे भूत : सोनिया गांधी

0

बंगळूर-मोदींवर सध्या काँग्रेस मुक्त भारताचे भूत लागले आहे. काँग्रेसमुक्त भारत तर सोडूनच द्या आपल्यासमोर इतर कोणी उभे राहिलेले ही त्यांना सहन होत नाही. मोदीजींचे वक्तृत्व चांगले आहे, ते एखाद्या अभिनेत्याप्रमाणे बोलतात. जर त्यांच्या भाषणाने देशातील भुकेल्यांची भूक शमू शकली तर मी नक्कीच आनंद व्यक्त करेन, पण केवळ भाषणाने रिकामी पोटं भरत नाहीत त्यासाठी अन्न आणि रोजगाराची गरज असते, अशा शब्दांत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्या कर्नाटकातील विजापूर येथे प्रचार सभेत बोलत होत्या.

ज्यावेळी सर्व राज्ये दुष्काळाने होरपळत होती तेव्हा केंद्र सरकारने त्यांना दिलासा देणे गरजेचे होते. कर्नाटकातील शेतकरीही दुष्काळाने होरपळे होते. त्यावेळी मदतीसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पंतप्रधानांची भेट घ्यायची होती मात्र, मोदींनी भेट नाकारली. या कृतीद्वारे मोदींनी केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे तर कर्नाटकचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारने कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, हे म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले.

काँग्रेसने कर्नाटकला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवले असून इथल्या जनतेसाठी अनेक महत्वपूर्ण योजनाही आणल्या आहेत. काँग्रेसने गरीबांसाठी न कंटाळता काम केले असून त्यांच्यासाठी महात्मा गांधी नरेगा योजना सुरु केली. त्याचा चांगला फायदाही झाला मात्र, भाजपा आणि मोदींनी या योजनेला विरोध केला होता.