हातातोंडाचा घास गेला; पंचनाम्यांची प्रतीक्षा

0

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा- नां. हरिभाऊ जावळे, खा. रक्षा खडसे, आ. शिरीष चौधरी यांची मागणी

जनशक्ति चमूकडून: सतत सुरु असलेल्या पावसामुळे गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हतबल झाले आहे. भुसावळ विभागातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन संपूर्ण जिल्हाभरात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची नामदार हरीभाऊ जावळेंची मागणी


फैजपूर: सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने केळी संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांनी प्रांताधिकारी यांना ओला दुष्काळाचा प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनाम्यांना सुरूवात झाली आहे. रब्बीचा हंगाम घेण्यासाठी पंचनामे तत्काळ होणे गरजेचे आहे त्या दृष्टीने पंचनामे तत्काळ पूर्ण करावे आणि त्या सोबतच ओल्या दुष्काळाचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नामदार हरीभाऊ जावळे यांनी प्रांताधिकारी अजित थोरबोले यांना दिल्या आहेत.

शेतकर्‍यांचा विमा असेल वा नसेल सरसकट सर्वाना ओल्या दुष्काळाचा लाभ मिळावा यासाठी प्रस्ताव सादर झाल्यावर मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांना ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी कृषी शिक्षण व संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष नामदार हरीभाऊ जावळे करणार आहेत त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात पंचनाम्यांना सुरुवात

मुक्ताईनगर : परतीच्या पावसाने मतदारसंघातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. ऐन दिवाळीसारखा लखलखाटी सण अंधारात गेल्याने बळीराजा अक्षरशः हतबल झाला असून तत्काळ नुकसान झालेल्या शेती पिकांच्या बांधावर जावून पंचनामे करा, अशा सूचना नुतन आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार शाम वाडकर व तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिवाळीच्या सुट्टीवर गेलेल्या कर्मचार्‍यांना तातडीने कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवार, 30 ऑक्टोबरपासून संयुक्तिकरीत्या पंचानामे सुरू करण्यात आले आहेत. शेतकर्‍यांनी तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा -डॉ.मधू मानवतकर

भुसावळ : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भुसावळातील समाजसेविका डॉ.मधू राजेश मानवतकर यांनी जळगाव जिल्हाधिकार्‍यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकर्‍यांना मदत करणे हे आद्य कर्तव्य मानून शासनाने तत्काळ पॅकेज जाहीर करावे, असे शासनाकडे पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.


रावेर लोकसभा क्षेत्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा- खा.रक्षा खडसे

मुक्ताईनगर : परतीच्या पावसामुळे मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा, भुसावळ या तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश परीस्थिती निर्माण झाली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांचा तोंडी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात गेली आहे. यामुळे कृषी व महसूल विभागाने तातडीने अतिवृष्टीग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत व त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना खासदार रक्षा खडसे यांनी बुधवारी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने रीपरीप सुरू ठेवल्याने खरीप हंगामातील वेचणीला आलेली कपाशी, कापणीला आलेली ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापणीला आलेले पीक काळे पडले आहे.तसेच ज्वारी, बाजरी काळी पडली असून मका व चार्‍याचे नुकसान झाले असल्याचे शेतकर्‍यांनी संपर्क करून कळविले आहे. सगळ्यात जास्त फटका कापसाला बसला आहे. कापूस खाली गळून पडल्याने अपेक्षित आलेले उत्पन्न बुडणार आहे. कापूस पिवळा व काळा पडला असून झाडावरच कोंब फुटल्याने शंभर टक्के शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याचे परीस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांच्या हाताशी आलेले उत्पन्न परतीच्या पावसाने उध्वस्त झाले आहे. शेतकर्‍यांना आर्थिक संकटात नेणार्‍या अतिवृष्टीग्रस्त झालेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी भागाने तातडीने करावेत आपल्या संबंधीत यंत्रणांना तातडीने सूचना करावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकान्वये केली आहे