बूटचोरीवरून लग्न मोडलेल्या वधूचे दुसऱ्या दिवशी लग्न

0

बीड : बूटचोरीवरुन झालेल्या वादानंतर लग्न मोडलेल्या मुलीला नवा जोडीदार मिळाला आहे. बीडच्या अंबाजोगाईतील तरुणाशी वधूची सोयरीक जुळली. लग्नात मुलीकडच्या मंडळींनी नवरदेवाचे बूट लपवून त्याच्याकडून पैसे घ्यायचे अशी प्रथा आहे. बीडच्या केज तालुक्यातील कुंभेफळ गावात बूट चोरण्यावरुन झालेला वाद विकोपाला गेला आणि रविवारी भर लग्नातचहाणामारी झाली. झालेले लग्न मोडून मुलीला तलाक घ्यावे लागले.

नबी सिकंदर शेख यांच्या मुलीशी सुलतान युनूस शेखचा रविवारी निकाह झाला. लग्नाआधी मुलीच्या भावाने नवरदेवाचे बूट लपवल्याने वाद झाला आणि त्याचं रुपांतर मारहाणीत झालं. मात्र सामोपचाराने हा वाद मिटला, लग्नही झालं. लग्नाआधी घडलेल्या प्रकारावरुन पुन्हा वादाला सुरुवात झाली. मग नवरदेवाने मुंडावळ्या आणि सेहरा काढून फेकून दिला. यानंतर जे घडलं, ते अतिशय धक्कादायक होतं. या हाणामारी नवरदेवाचं डोकं फुटलं आणि त्याला सहा टाके पडले. सासऱ्यानेच आपल्या हातातील लाकडाने नवरदेवावर वार केल्याचा आरोप आहे.

सुलतानवर केजच्या सरकारी रुग्णालयात उपचार केल्यावर, नवरदेवाची मंडळी युसूफ वडगाव पोलिस स्टेशनला गेली. मात्र ही मंडळी पोलिस स्टेशनला गेल्याचं कळताच वधूकडच्या मंडळीनी वऱ्हाडींचा टेम्पो अडवून ठेवला. बराच काळ तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिस दाखल झाले. मात्र शेवटी हा वाद तलाक झाल्यावरच संपला. यानंतर वराकडची मंडळी तुळजापूरला परतली.