अलीगढ: उत्तरप्रदेशातल्या अलीगढमध्ये एका दाम्पत्याने १० हजारांचे कर्ज न फेडल्याने दोन जणांनी या दाम्पत्याच्या अडीच वर्षांच्या मुलीची क्रूर हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी संबंधित कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ट्विट करून न्यायची मागणी केली आहे.
अलीगढमध्ये घडलेली घटना ही अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेमुळे मी विचलित झालो आहे. एखाद्या लहान मुलीची इतकी क्रौर्याने हत्या करायला माणसांचे हात कसे काय धजावतात? ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणी न्याय झालाच पाहिजे असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे तर अलीगढमध्ये जी घटना घडली ती अमानवी आणि क्रौर्याचा कळस गाठणारी घटना आहे. आपण हा कसा समाज तयार करतो आहोत? त्या मुलीच्या आई वडिलांना आता काय वाटत असेल याचा विचार केला तरीही अंगावर काटा येतो. जे अपराधी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.