मुंबई-काँग्रेसने आंदोलनात वापरलेल्या दोन घोड्यांना खेरवाडी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराला विरोध करण्यासाठी गुरुवारी आंदोलन आयोजित केलं होतं, ज्यामध्ये या घोड्यांचा वापर करण्यात आला होता. अशक्त आणि थकलेल्या जनावरांना निर्दयीपणे वागणूक दिल्याचा आरोप करत पेटा या प्राणीमित्र संस्थेने घोड्याच्या मालकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
आंदोलनादरम्यान प्रत्येकजण घोड्यावर बसत होता. रखरखत्या उन्हात पाणी आणि अन्न न देता घोड्यांना जबरदस्तीने चालायला लावलं जात होतं. यावेळी घोड्यांचे मालक जबरदस्तीने त्यांना पुढे ढकलत होते, तसंच नेते आणि कार्यकर्त्यांना घोड्यावर बसून फोटो काढण्याचीही परवानगी देत होते असं पेटाकडून सांगण्यात आलं. पोलिसांनी दोन्ही घोड्यांची सुटका केली असून, मालाडला त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
“मुंबईत घोड्यांना पाळणं बेकायदेशीर आहे. तसंच त्यांना रॅली आणि आंदोलनात वापरण्याची परवानगी नाहीये. हे अत्यंत क्रूर आहे”, असं पेटाने सांगितलं आहे. राजकीय पक्षांनी लक्ष वेधून घेणारं आंदोलन केलं पाहिजे, ज्यासाठी ते अनेक वेगळ्या कल्पना अंमलात आणू शकतात. मात्र त्यासाठी प्राण्यांचा वापर केला जाऊ नये. पेटा पोलीस आणि महापालिकेसोबत मिळून दुर्लक्ष करण्यात येत असलेल्या प्राण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितले आहे.