नवी दिल्ली: भारताच्या जगजित पोवाडीया यांची इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या (आयएनसीबी) सदस्यपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या मतदानाच्या पहिल्या फेरीत पोवाडीया यांना 44 मते मिळाली. जगजित पोवाडीया 2015 सालापासून इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या सदस्यपदी कार्यरत आहेत. यावेळी पुन्हा पाच वर्षांसाठी त्यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा सध्याचा कार्यकाळ 2020 साली पूर्ण होणार असून त्या पुन्हा 2020 ते 2025 या कालावधीसाठी सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे भारताचे राजदूत सैय्यद अकबरुद्दीन यांनी पोवाडीया यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
मंगळवारी इकोनॉमिक अँड सोशल काऊंसिलच्या 54 सदस्यांपैकी 5 सदस्यांच्या निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 5 जागांसाठी तब्बल 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी 28 मतांची आवश्यकता असते. परंतु पोवाडीया यांना या निवडणुकीत 44 मते मिळाली. तर मोरोक्कोच्या जलाल तौफिक आणि चीनच्या हाओ वेई यांना पहिल्या टप्प्यात 22 आणि दुसऱ्या टप्प्यात 19 मते मिळाली. दरम्यान, पोवाडीया यांनीदेखील एका व्हिडिओ संदेशाद्वारे सर्वांचे आभार मानले. तसेच आपल्यावर सोपवण्यात येणारी जबाबदारी योग्यरित्या पार पाडणार असल्याचेही त्या म्हणाल्या.