नाशकात प्रवाशाला लुटणाऱ्याला जळगाव शहरातून केली अटक

जळगाव प्रतिनिधी ।

तुम्हाला सोडून देतो, असे सांगून रिक्षाचालकासह चौघांनी प्रवाशाला निर्जनस्थळी नेत मारहाण करून १० हजार रूपये लुटल्याची घटना नाशिक येथील मुंबई- आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाटा ते पिंपळगाव बसवंत वणी चौफुलीजवळ ९ एप्रिल रोजी सायंकाळी घडली होती. या गुन्यातील एका संशयिताला जळगाव शहर पोलिसांनी गुरुवारी गेंदालाल मिल येथून अटक केली असून दिनेश सुनील सोनवणे (रा. सुरेशदादा जैननगर, गेंदालाल मिल) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.. कोकणगाव शिवारातील (नाशिक) रहिवासी पंडित राजाराम ढोणे यांना १ एप्रिल रोजी सायंकाळी एका रिक्षा चालकाने तुम्हाला सोडून देतो सांगून रिक्षामध्ये बसविले. त्यांच्या आजू-बाजूला रिक्षा चालकाचे साथीदार बसले. नंतर ढोणे यांना कोकणगाव फाटा ते पिंपळगाव बसवंत वणी चौफुलीजवळील निर्जनस्थळी नेवून त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील १० हजार रुपयांची रोकड चौघांनी हिसकावून धूम ठोकली होती. याप्रकरणी १० एप्रिल रोजी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तर पोलिसांनी रिक्षा चालक वसीम शेरअली तेली (३४, रा. पवारवाडी, ता. मालेगाव) याला अटक केली होती. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्यात दिनेश सोनवणे (रा. सुरेशदादा जैननगर, गेंदालाल मिल, जळगाव), शेख जावेद सलीम, शेख मुस्तफा (दोन्हीरा, सुरत) या साथीदारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. ही माहिती नाशिक पोलिसांनी शहर पोलिसांना दिली होती. अखेर गुरुवारी दिनेश हा गेंदालाल मिल येथे आला असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्यातील तेजस मराठे व योगेश पाटील यांनी मिळाली. त्यांनी लागलीच त्याला पकडून पोलिस ठाण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.