बाजार समिती निवडणूकीचा आखाडा रंगतोय आरोप – प्रत्यारोपांनी

  बोदवड मध्ये वर्चस्वाची तर भुसावळात गुरु शिष्याची लढाई 

 वरणगांव l

सदयस्थितीत राज्यात बाजार समिती निवडणूकांचा राजकीय आखाडा आरोप – प्रत्यारोपांनी चांगलाच तापू लागला आहे . यामध्ये बोदवड व भुसावळ बाजार समितीचा समावेश असुन बोदवडमध्ये एकनाथराव खडसे यांची वर्चस्वासाठी तर भुसावळात गुरु शिष्यांची लढाई असे चित्र निर्माण झाले असून या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर गत दोन दशकांपासुन आ . एकनाथराव खडसे यांचे एकहाती वर्चस्व राहीले आहे . तर या बाजार समितीचे मुख्य कार्यालय बोदवड असुन वरणगांव, जामठी व कुऱ्हा – काकोडा अशा तिन ठिकाणी उपबाजार समिती स्थापन करण्यात आली असून हि उपबाजार समिती महामार्गावर असल्याने सोमवारी म्हशींचा तर मंगळवारी बकरी व बैलांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो . तसेच बाजार समितीच्या जागेत व्यापारी संकुलही बांधण्यात आले असून बाजार समितीची मुख्य इमारत एका खाजगी शैक्षणिक संस्थेला भाडेतत्वावर देण्यात आली असल्याने बोदवड बाजार समितीची निवडणूक दरवर्षी चुरशीची ठरते . व यामध्ये आ . एकनाथराव खडसे गत दोन दशकांपासुन एकहाती सत्ता मिळवत आले आहेत . मात्र, यंदाच्या या निवडणूकीत आ . एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीच्या ( महाविकास ) शेतकरी विकास पॅनलच्या विरोधात आ . चंद्रकांत पाटील यांनी भाजपा व शिवसेना युतीचे शेतकरी परिवर्तन पॅनल उभे केले असून या दोन्ही पॅनलमध्ये चुरशीची लढत होवून हि निवडणूक दोघांसाठी वर्चस्वाची ठरणार आहे. निवडणूकीत दोन्ही पॅनलचे प्रत्येकी १८ असे ३६ व एक अपक्ष मिळुन ३७ उमेदवार रिंगणात असून सर्व गटातील मतदार संख्या १९५० च्या जवळपास आहे .

भुसावळात गुरु – शिष्याची लढाई

भुसावळ बाजार समितीचा विस्तार हा भुसावल पुरताच असुन या बाजार समितीची एकही उपबाजार समिती नाही . तसेच तालुक्यातुन या बाजार समितीची मतदार संख्या केवळ २८६ असलीतरी या निवडणूकीची लढाई माजी आ. संतोष चौधरी व विद्यमान आ . संजय सावकारे यांच्या मध्ये चुरशीची ठरणार आहे . शतकापूर्वी भुसावळ मतदार संघ राखीव घोषीत झाल्याने माजी आ. संतोष चौधरी यांनी त्यांचे स्विय सहायक असलेले संजय सावकारे यांना राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडुन उमेदवारी मिळवीत त्यांना विजयी करून आणले होते . यामुळे या दोघांचे नाते गुरु – शिष्याचे मानले जात होते . मात्र, काही राजकीय मतभेदानंतर आ . सावकारेंनी आ . एकनाथराव खडसे यांचेवर विश्वास दर्शवून (गुरुत्व स्विकारून ) भाजपा मध्ये प्रवेश केला . यानंतर आ . खडसे यांनी चुरशीच्या लढतीत आ . सावकारे यांना भाजपाच्या तिकीटावर विजयी केले असल्याचे सांगितले जाते . मात्र, आ . खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने या दोघांमध्येही राजकीय वितुष्ठ निर्माण झाल्याने ( आ. सावकारे यांनी भाजपातच ठिय्या मांडला आहे ) दोन्ही बाजार समितीच्या प्रचार मेळाव्यातून ऐकमेंकावर आरोप – प्रत्यारोप केले जात असल्याने भुसावळ बाजार समितीच्या निवडणूकीची हि लढाई गुरु – शिष्यासाठी महत्वपूर्ण मानली जात असुन या निवडणूकीत ३८ उमेदवार रिंगणात आहेत .