पिंपरी-कचरा वेचकांच्या मुलांना मेट्रीकपूर्व शिष्यवृत्ती मिळण्यास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायचीच्या वतीने पुण्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. केंद्र शासनाच्या वतीने अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या कामगारांच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना दरवर्षी प्रत्येकी १८५० रुपये शिष्यवृत्ती मिळते. ती देण्यास समाज कल्याण कार्यालयाकडून विलंब केला जात आहे. त्या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीची मागणी
शिष्यवृत्ती योजनेतील १२७९ विद्यार्थ्यांची यादी जिल्हा समाज कल्याण अधिका-यांना दिली आहे. या विद्यार्थ्यांची संबधित शाळांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून ही रक्कम लवकरात लवकर विद्यार्थ्यांना मिळावी. तसेच, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कचरावेचकांच्या मुला-मुलींना २०१६, २०१७ आणि २०१८ या तीन वर्षांतील अस्वच्छ व्यवसाय मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, अशी मागणी पंचायतीने केली आहे.
अनेक संघटनांचा पाठिंबा
आंदोलनात पुणे महापालिकेचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी कामगारांची भेट घेऊन पाठिंबा दिला. त्यांनी स्थानिक अधिकारी, संबधित मंत्री आणि गरज पडल्यास केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, या संबंधी मुंबईत काम करणा-या स्त्री मुक्ती संघटनेनेही आंदोलनाला पाठिंबा दिला. कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीच्या अध्यक्षा सुरेखा गाडे, सहसचिव सोनाली कुंजीर, सुमन मोरे, सुरेखा म्हस्के, जयश्री शिंदे, आशा खरात, शिता पवार, मंगल गायकवाड, विजया चव्हाण या महिला आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. प्रशासनाने दखल न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे.