पालिकेमार्फत महाराष्ट्र दिनाची सुटी असतांना रोडला जोडणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर काम करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले

शहादा l येथील विकास हायस्कूल मागील प्रकाशा रोडला जोडणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर पालिकेमार्फत महाराष्ट्र दिनाची सुटी असतांना काम करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा रहदारीचा रस्ता खोदल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या गैरसाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी व कामावर हजर व्यक्तींनी पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार काम होत असल्याचे सांगून कानावर हात ठेवले आहेत. सध्या पालिकेवर प्रशासक राज असून शहरातील विविध भागात सुरू असलेल्या कामांवर नेमके प्रशासनाचे नियंत्रण आहे किंवा नाही याबाबत शहरवासीयांना प्रश्न पडला आहे.

गत सुमारे दीड वर्षापासून पालिकेवर प्रशासक राज सुरू आहे. पदाधिकारी नसल्याने प्राथमिक सोयी सुविधांसाठी नागरिकांना ताटकळत राहावे लागत आहे. अशातच प्रशासकांकडून शहरातील विविध भागात विकास कामांच्या नावाखाली कामे करण्यात येत आहेत. मात्र, त्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फलक लावले नसल्याने नेमके काम कोणत्या निधीतून होत आहे याबाबत शहरवासीयांना प्रश्न पडला आहे. काही ठिकाणी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली नसतांनाही कामे केली जात असून असाच काहीसा प्रकार शहरातील विकास हायस्कूल मागील प्रेस मारुती परिसरात असलेल्या प्रकाशा रस्त्याला जोडणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर झाला आहे. आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनाची सर्वत्र सुट्टी असतांना हा रहदारीचा रस्ता खोदण्यात आला आहे. या ठिकाणी जेसीबी मशीनचा वापर करून पाईप टाकण्यात येत आहेत. जेसीबी व चार मजुरांच्या उपस्थितीत केल्या जात असलेल्या कामाबाबत वाहनधारक व नागरिकांनी विचारणा केली असता संबंधितांनी कानावर हात ठेवून सदर काम पालिकेमार्फत केले जात असल्याचे सांगितले. ड्रेनेजची पाईपलाईन मुख्य पाईपलाईनला जोडण्यासाठी रस्ता खोदण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत काही नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधला असता बांधकाम विभागातील अभियंता आशिष महाजन यांनी याबाबत मुख्याधिकारी तथा प्रशासकच माहिती देऊ शकतील असे सांगून कानावर हात ठेवले. मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता त्यांच्या मोबाईल बंद येत असल्याने खऱ्या अर्थी शहादा नगरपालिकेत प्रशासक राज सुरू असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे. सदर काम नेमक्या कोणत्या निधीतून तसेच कोणाच्या तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीने करण्यात येत आहे याबाबत याबाबत चर्चा केली जात असून मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी माहिती देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात.

दरम्यान, याच प्रभागातील संभाजीनगर भागात रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र ड्रेनेज व सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारीची सुविधा केली नसल्याने रहिवाशांना उघड्यावर पाणी फेकावे लागत आहे. यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. तसेच खुल्या जागांवर पाणी टाकण्यात येत असल्याने शेजारील रहिवाशांशी वाद निर्माण होत असल्याने पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी याची दखल घेऊन या भागात सांडपाणी वाहतुकीसाठी गटारींची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे.