महापालिका दुसऱ्या टप्प्यात २ हजार ९३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार…
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरात दुसऱ्या टप्प्यात २ हजार ९३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या मान्यतेने या कॅमे-यांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यासाठी १६९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी सांगितले.
महापालिकेने या पूर्वी २ हजार ४९० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तर, स्मार्ट सिटीने ३ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. माजी नगरसेवक, सामाजिक संघटना व नागरिकांनी मागणी केल्यानुसार महापालिका पोलिसांची परवानगी घेऊन आणखी २ हजार ९३० सीसीटीव्ही कॅमेरे बसवत आहे.
शहरातील वर्दळीचे चौक, रुग्णालय, शाळा, मंडई आदी विविध ५०० ठिकाणी २ हजार ८०० कॅमेरे उभारण्यात येतील. दहा ठिकाणी वाहनांचे वेगावर लक्ष देणारे कॅमेरे लावण्यात येतील. तर, बीआरटीएस मार्गावर विविध ६० ठिकाणी १२० कॅमेरे लावण्यात येणार आहे. असे एकूण २ हजार ९३० कॅमेरे विविध ५७० ठिकाणी लावण्यात येणार आहेत. लवकरच हे काम सुरू केले जाणार आहे, असे सह शहर अभियंता गलबले यांनी सांगितले.